जळगाव : इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा शाखा जळगावच्या वतीने जळगावकर नागरिकांनी उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे जास्तीत जास्त मतदान करावे यासाठी शहरात विविध ठिकाणी सेल्फी पॉईंट्स आणि हजारो बॅचेस वितरित करण्यात आले. स्वयंसेवकांनी प्रत्येक मतदान केंद्रावर उपस्थित राहून सर्वांना बॅचेसचे वितरण केले.
आज सोमवार, १३ मे रोजी सकाळी जिल्हाधिकारी तथा रेडक्रॉस अध्यक्ष आयुष प्रसाद यांनी रेडक्रॉस भवन येथे उपस्थित राहून उत्साहाने आणि उत्स्फूर्तपणे मतदान केलेल्या रेडकॉस पदाधिकारी,सभासद, कर्मचारी आणि उत्साही मतदार या सर्वांसोबत समूह फोटोग्राफ काढला. जिल्हाधिकारी यांच्या समवेत सर्वांनी एकदिलाने एकसाथ सामुहिक राष्ट्रगीत म्हणत वातावरणात राष्ट्रभक्ती जागविली. मतदानाचा उत्साह असाच टिकून राहावा आणि जास्तीत जास्त नागरिकांनी मतदान करावे यासाठी जिल्हाधीकारी महोदयांनी सर्वांना आवाहन केले. याप्रसंगी रेडक्रॉसचे उपाध्यक्ष गनी मेमन, चेअरमन विनोद बियाणी, रक्तकेंद्र चेअरमन डॉ. प्रसन्नकुमार रेदासनी, आपत्ती व्यवस्थापन चेअरमन सुभाष सांखला, डीडीआरसी नोडल ऑफिसर घनश्याम महाजन, कार्यकारिणी सदस्य डॉ.अपर्णा मकासरे, अनिल शिरसाळे, रेडक्रॉसचे सभासद, कर्मचारी, स्वयंसेवक आणि उत्साही मतदार परिवारासह उपस्थित होते.