जिल्हाधिकारी : शासकीय योजनांची माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यत पोहोचविणार

धुळे : भारत सरकारच्या फ्लॅगशिप योजनांचे लाभ लक्षित लाभार्थ्यांपर्यत पोहचावेत यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने धुळे जिल्ह्यात 22 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी 2024 या कालावधीत विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांची माहिती प्रत्येक लक्षित लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यास निश्चित मदत होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी बैठकीत दिली.

विकसित भारत संकल्प यात्रेनिमित्ताने आज सातपुडा सभागृहात जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, अपर जिल्हाधिकारी देवदत्त केकाण, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, निवासी उपजिल्हाधिकारी नितीन गावंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश मोरे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे, डाक विभागाचे प्रवर अधिक्षक पी.आर.सोनवणे, शिक्षणाधिकारी मोहन देसले, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक आर.के.शर्मा, यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी गोयल म्हणाले की, धुळे जिल्ह्यात 22 नोव्हेंबर 2023 ते 26 जानेवारी, 2024 या कालावधीत केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने विकसित भारत संकल्प यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या यात्रेमार्फत विविध योजनेतंर्गत पात्र असलेल्या परंतू आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकापर्यंत प्रत्यक्ष संवाद साधून  सरकारी योजनांचा लाभ देणे व संभाव्य लाभार्थ्यांची नोंदणी करणे हा या यात्रेचा मुख्य उद्देश आहे. ही यात्रा गावपातळी, सर्व ग्रामपंचायत क्षेत्र, नगरपालिका/नगरपरिषद, महानगरपालिकेच्या क्षेत्रात जाणार असल्याने या यात्रेचे दरदिवसाचे सर्व यंत्रणांनी सुक्ष्म नियोजन करावे. यासाठी तालुकास्तरावर समितीची स्थापन करुन यात्रेपुर्वी समितीची बैठक घेण्यात यावी. तसेच गावपातळीवर या अभियान दरम्यान कोणत्या गावात , कोणत्या ठिकाणी जाणार आहे याची माहिती प्रसार माध्यमांना देण्यात यावी.