जिल्हास्तरीय अधिकारी देणार एक दिवस शाळेसाठी

तरुण भारत लाईव्ह । १७ जानेवारी २०२३। राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 अंतर्गत विद्यार्थ्यांना भाषा व संख्याज्ञान येण्याच्या दृष्टिकोनातून राज्याच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णय 27 ऑक्टोबर 2021 अन्वये जिल्ह्यात निपुण भारत उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. निपुण भारत या उपक्रमांची अंमलबजावणी व यशस्विता तसेच शिक्षकांचा उत्साह वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पुन्हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम 19 जानेवारी रोजी राबविण्यात येत आहे.
या संकल्पनेत शाळा स्तरावर विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना गुणवत्ता पूर्ण शिक्षण देऊन त्यांच्यातील क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढावी यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

यापूर्वीच जिल्ह्यात पालक संपर्क अभियानाचे प्रभावी अंमलबजावणी सुरू असून त्यात सर्व शिक्षक आणि अधिकारी पालकांच्या नियमित भेटी घेत असून शिक्षक आणि पालकांचा संवाद यानिमित्ताने वाढलेला आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यात पुन्हा एक नावीन्यपूर्ण उपक्रम एक दिवस शाळेसाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या दिवशी जिल्हास्तरावरील सर्व विभागांचे खाते प्रमुख व अन्य अधिकारी तसेच तालुका स्तरावरील सर्व विभागाचे अधिकारी ज्या शाळांतील अप्रगत विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त आहे, अशा शाळांना भेटी देणार असून शाळेत सुरू असणार्‍या उपक्रमाचा आणि विद्यार्थी प्रगतीचा आढावा घेणार आहेत . तसेच विविध विभागांच्या माध्यमातून शाळा स्तरावर आणखी काय नावीन्यपूर्ण उपक्रम राबवता येतील याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत.