जिल्हा परिषदेतर्फे व्हिलचेअर्स, बालसंगोपन केंद्रासह आरोग्य सेवा उपलब्ध 

जळगाव : जळगाव जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची रणधुमाळी संपली. या निवडणूकीत जिल्हा निवडणूक प्रशासनाने मतदान वाढीसाठी जनजागृतीसह विविध उपक्रम राबविले.  यात ग्रामीण भागात अत्यावश्यक सुविधांतर्गत दिव्यांग तसेच ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांसाठी व्हिल चेअर्सची सुविधा तर मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांच्या मुलांना सांभाळण्यासाठी बालसंगोपन केंद्र व पाळणाघरासह खेळणी जिल्हा परिषद प्रशासनातर्फे उपलब्ध करून देण्यात आली होती, अशी माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणूक मतदान प्रक्रियेत महसूल प्रशासनाची महत्वाची भूमिका बजावली आहे. यात शहरी भागात महानगरपालिका, नगरपालिका स्तरावर स्थानिक प्रशासनाने मतदारांसाठी अत्यावश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यात. यात जिल्हा परिषद महिला बालकल्याण विभागांतर्गत मतदानासाठी येणाऱ्या स्तनदा मातांच्या मुलांना सांभाळण्यासाठी अंगणवाडी सेविका मदतनीसातर्फे 1 हजार 876 बालसंगोपन केंद्रांची सुविधेसह या पाळणाघरात लहान मुलांसाठी विविध खेळणी उपलब्ध करून देण्यात आली होती.
दिव्यांग मतदानाची टक्केवारी वाढली
ग्रामीण भागात ग्रामपंचायत स्तरावरील ज्येष्ठ, वयोवृद्ध, दिव्यांग मतदारांसाठी विविध मतदान केंद्रावर जिल्हा परिषद प्रशासन व आरोग्य विभागाच्या माध्यमातून 344 व्हिलचेअर्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. उपलब्ध सुविधांमुळे 2024 सार्वत्रिक निवडणूकीत दिव्यांग मतदानाच्या टक्केवारीत 25 टक्के वाढ झाली आहे.

15 हजाराहून अधिक महिला मतदारांना ओपीडीचा लाभ
निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषद प्रशासनाकडून ग्रामीण भागातील महिला मतदारांसाठी आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. यात मतदान केंद्रात मतदान केल्यानंतर मतदारांना केंद्रालगतच जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे आरोग्य तपासणी केंद्र उभारण्यात आले होते. याठिकाणी बाह्य रूग्ण तपासणी केंद्रात 15 हजार 216 महिला मतदारांनी या सुविधेचा लाभ घेतला. रावेर लोकसभा मतदार संघांतर्गत भुसावळ विधानसभा क्षेत्रात सर्वात जास्त 2हजार 527 महिला मतदारांनी लाभ घेतला. त्याखालोखाल मुक्ताईनगर येथे 1हजार 708 तर जळगाव लोकसभेंतर्गत चाळीसगाव तालुक्यात 1 हजार 480 महिला मतदारांना या ओपीडी आरोग्य सुविधेचा लाभ मिळाला असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंकीत यांनी दिली.