जिल्हा पोलीस दल भरती; बुधवारपासून पोलीस मैदानावर प्रक्रिया

जळगाव : जळगाव जिल्हा पोलीस दलात १३७ पदासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. बुधवार, १९ पासून पोलीस दलाच्या कवायत मैदानावर पहाटे ४.३० वाजता सुरुवात होईल.
पहिल्यांदाच उमेदवारांच्या पायांना चीप लावली जाणार आहे. त्यामुळे ही परीक्षा पारदर्शक पध्दतीने होत आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पोलीस दल भरती परीक्षेसंदर्भात उमेदवारांना वेळापत्रक, हॉल टिकीट ऑनलाईन पाठविण्यात आले आहे. १९ रोजी ५००, त्यानंतर एक हजार मुलांची रोज परीक्षा होईल. वाहतूक पोलीस शाखेच्या आवारात टाकण्यात येणाऱ्या शामियानात उमेदवारांना बसण्याची सोय उपलब्ध केली जाणार आहे. येथे उमेदवार फॉर्म भरतील. त्यानंतर ५०-५० उमेदवारांचा समूह परीक्षेसाठी सोडले जातील. तीन स्तरावरील उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना डाक्यूमेंट्रीसाठी पाठविण्यात येईल. यासाठी उमेदवारांनी सत्यप्रत देणे आवश्यक असेल. फिंगरप्रिंट फोटोग्राफ घेतले जातील, अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. रेड्डी यांनी दिली.
मैदानी परीक्षेत या खेळांचा आहे समावेश
पोलीस कवायत मैदानावर १०० मीटर, १६०० मीटर किंवा गोळाफेक अशा मैदानी परीक्षेचे नियोजन केले आहे. याठिकाणी शारिरीक चाचणी होईल. उमेदवारांच्या पायाला चीप लावण्यात येणार आहे. यामुळे प्रत्येक परीक्षा पारदर्शक होईल. तसेच मॅट क्रॉस झाल्यास प्रकार समोर येईल. संपूर्ण परीक्षा भरती प्रक्रिया सीसीटीव्ही निगरानीत होत आहे. भरती प्रक्रिया राबविण्याच्या अभियानात पोलीस अधीक्षक, दोन अपर पोलीस अधीक्षक, पाच पोलीस उपअधीक्षक, दहा पोलीस निरीक्षक, १५ पीएसआय तसेच ३५० कर्मचारी असणार आहेत. ६,५५७ उमेदवारांचे अर्ज उपलब्ध झाले आहेत. यात महिला उमेदवारांचाही समावेश आहे. १९ ते मंगळवार २५ पर्यत भरती प्रक्रिया राबविण्यात येईल. ही प्रक्रिया आटोपल्यानंतर पात्र उमेदवारांची निवड यादी जाहीर केली जाणार आहे.