जिल्ह्यात डेंग्यूचे 6 रुग्ण जळगावसह चोपडा, भुसावळ तालुक्यात डेंग्यूचे रुग्ण

 

जळगाव : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार डेंग्यूच्या 72 संशयित रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यात 6 रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्याचा ऋतू संक्रमण काळ असल्याने डेंग्यूच्या डासांच्या उत्पत्तीस वातावरण अनुकूल असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात भुसावळ ग्रामीणमध्ये सर्वांधिक तीन रुग्ण, तर चोपडा ग्रामीणमध्ये एक रुग्ण डेंग्यू पॉझिटिव्ह आढळला. खासगी रुग्णालयाकडून आकडेवारी दिली जात नसल्याने जिल्ह्यातील प्रत्यक्ष डेंग्यूची रुग्ण संख्या समोर येत नसल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांची नोंद झाल्यास जिल्ह्यातील प्रत्यक्ष डेंग्यूची स्थिती लक्षात येणार आहे.

खासगी रुग्णालयांना डेंग्यू रुग्णांची माहिती देणे सक्तीचे

जिल्ह्यात खासगी रुग्णालयात उपचार घेणार्‍या डेंग्यू रुग्णांची माहिती देणे सक्तीचे करण्यात येणार आहे. त्यासाठी यासंदर्भात पत्रक काढण्यात येणार असल्याचे जिल्हा आरोग्याधिकारी डॉ.तुषार देशमुख यांनी सांगितले. कारण खासगी रुग्णालयातील आकडेवारी प्राप्त झाल्यास उपाययोजना करण्याच्या दृष्टीने सोयीचे होणार आहे.

जिल्ह्यातील आरोग्य विभागात डेंग्यू रुग्णांच्या नोंदीत तफावत असल्याचे दिसून येते. कारण त्यात खासगी रुग्णालयातील रुग्णांची नोंद नाही. खासगीत उपचार घेणार्‍यांची संख्याही मोठी असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णांमध्ये पांढर्‍या पेशी कमी होतात. तातडीने तपासणी करून उपचारासाठी रुग्ण खासगीत रक्ताची तपासणी करून उपचार घेतात. कारण डेंग्यूची बाधा झाल्यानंतर रुग्णावर जलद गतीने उपचारानंतर तो पूर्णपणे बरा होतो. त्या तुलनेत रुग्णांनी शासकीय रुग्णालयात रक्ताचीं तपासणी केल्यास चाचणीचा रिपोर्ट उशिरा मिळत असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. त्यासाठी शासकीय रुग्णालयाकडूनही डेंग्यू संशयित रुग्णांचा रक्तांची चाचणी रिपोर्ट तातडीने मिळण्याची मागणी होत आहे.