जळगाव : जिल्हा परिषदेच्या शाळेतील चौथीच्या विद्यार्थ्यांस वाचनासह पाढे येत नसल्याचा मुद्दा आ.मंगेश चव्हाण यांनी उपस्थित केला. यासंदर्भात प्राथमिक शिक्षणाधिकारी विकास पाटील यांना जाब विचारला. जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी तातडीने पाऊले उचलण्याची सूचना ना.गिरीश महाजन यांनी बैठकीत दिली.
आ.मंगेश चव्हाण यांनी जिल्ह्यात निपुन चाचणी मध्ये शाळांची गुणवत्ता ढासळली असे सांगिंतले.त्यावर ना.गिरीश महाजन यांनी जि.प शाळांकडे लक्ष ठेवा,गुणवत्तेबाबत तडजोड करू नका,यावेळी शिक्षणाधिकारी विकास पाटील यांनी दुसर्या निपून चाचणीचा अहवाल आला असून जिल्ह्यातील शाळांची गुणवत्तेत आता सुधारणा होत असल्याचे सांगितले.
जिल्हा परिषदेच्या विविध विकास कामांचा आढावा घेण्यासाठी १५ रोजी ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जि.प.च्या सानेगुरूजी सभागृहात अधिकार्यांची आढावा बैठक घेवून अधिकार्यांना खडेबोल सुनावले.तसेच गुणवत्ता पुर्ण कामे करा, चुकीची कामांना थारा देणार नाही असा दम अधिकार्यांना भरला. याबैठकीस आ.मंगेश चव्हाण, सीईओ डॉ.पंकज आशिया, अति.सीईओ बाळासाहेब मोहन, प्रकल्प संचालक मिनल कुटे यासह सर्व विभाग प्रमुख तसेच जे.के.चव्हाण, जि.प सदस्य नंदकिशोर महाजन, मधुकर काटे उपस्थित होते.
आ.मंगेश चव्हाण यांनी चाळीसगाव तालुक्यात ओढरेसह ७ शाळांच्या खोल्या चांगल्या असतांना त्या दुरूस्त करण्यात आल्या. मात्र दुरूस्ती केल्यानंतर या शाळा गळायला लागल्या आहे. शाळा दुरूस्तीची कामे नको त्या ठिकाणी करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. ना.महाजन यांनी हा प्रकार जिल्ह्यात अनेक ठिकाणी आहे,३ लाखाची दुरूस्ती म्हणजे निव्वळ कागदावर असल्याचे सांगितले. आहे. ८० टक्के रक्कम स्व:हा केली जाते, त्यामुळे हे धंदे थांबवा असा दम त्यांनी भरला. पाच कोटीच्या दुरूस्तीच्या कामात दर्जेदार कामे करा, चुकीच्या ठिकाणी करू नका असेही ते म्हणाले.
गेल्या वर्षी जिल्हाभरात शाळा दुरूस्तीचे कामे मोठ्या प्रमाणात करण्यात आली. ३ लाखात एक शाळा खोली दुरूस्ती हा प्रकार म्हणजे यातून ८० टक्के रक्कम डायरेक स्वह: करण्याचा प्रकार अनेक ठीकाणी घडला आहे.हे धंदे आता बंद करा, गुणवत्तापुर्ण कामे होत नसतील तर ते बंद करा अशा शब्दात ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी जि.प.च्या अधिकार्यांचे कान टोचले.
जामनेर तालुक्यात शोष खड्डयांचा पायलट प्रोजेक्ट
जामनेर तालुक्यात अनेक गावे, पाड्यांवर गल्लोगल्ली पाणी साचते.त्यामुळे मराठवाड्याच्या धर्तीवर मनरेगाच्या माध्यमातून शोष खड्यांचा पायलट प्रोजेक्ट जामनेर तालुक्यात राबवा,हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर तो जिल्ह्यात राबवू असे सांगत त्यांनी जामनेर पासून याची सुरवात करण्याचे आदेश ग्रामविकास मंत्री ना.गिरीश महाजन यांनी स्वच्छता विभागाला दिले.
पाणी योजनांचे स्त्रोत तपासून कामे प्रास्तावित करा
जलजिवन मिशन अंतर्गत मोठ्या प्रमाणात योजना राबविल्या जात आहे. योजना करायच्या म्हणून करू नका,योजना पुर्ण आणि पाणी नाही असे होता कामा नये,यासाठी आधी पाण्याचा स्त्रोत तपासा,स्त्रोत दुर असला तरी चालेल पण योजना टीकणारी पाहीजे यासाठी दर्जेदार कामे करा,अशा सुचना ना.महाजन यांनी केल्या.तसेच जे ठेकेदार काम करत नाही त्या ठीकाणी नविन टेंडर प्रक्रीया राबवा असे ही ना.महाजन म्हणाले.
मेढाचा सोलर पंप निरूपयोगी
जिल्ह्यात ५० ठिकाणी मेढा अंतर्गत सोलर पंप बसविण्यात आले आहे, ते बंद असल्याने त्याबाबत बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. या पंपापैकी ४० पंप बंद असून तसा अहवाल मेढाला पाठविला असल्याचे अधिकार्यांनी सांगितले. तो अहवाल आपल्याकडे द्या त्यावर कारवाई करू असेही ना.महाजन यांनी सांगितले.तसेच बचत गटांचा आढावा घेतांना त्यांनी तालुकास्तरावर बचत गटांना जागा उपलब्ध करून बाजारपेठ उपलब्ध करा, जिल्हास्तरावर देखील तसे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.घरकुल योजनांचा देखील त्यांनी आढावा घेतला.ओबीेसीे व जनरलसाठी घरकुलची योजना आणण्याबाबत देखील प्रयत्नशिल असल्याचे ते म्हणाले.