जे काही घडलं त्याची जबाबदारी…,मॉरिसच्या पत्नीनं सगळं सांगितलं

मुंबई: शिवसेनेचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यावर यंघोषित समाजसेवक मॉरिस नोरोन्हा उर्फ मॉरिस भाईनं गोळ्या झाडून हत्या केल्यानंतर त्यानं स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना बोरिवली पश्चिमेतील आयसी कॉलनीत गुरुवारी (८ फेब्रुवारी) रोजी घडली होती.

यावर त्यांच्या पत्नी सरीना माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, माझ्या लेकीनं तिचे वडील गमावले आहेत. त्याबद्दल मला वाईट वाटतं. पण तितकंच दु:ख मला अभिषेक घोसाळकरांच्या मुलांबद्दलही वाटतं, एखाद्याला कोणी इतकाही त्रास देऊ नये त्याचे परिणाम वेदनादायी होतील. जे काही घडलं त्याची जबाबदारी मॉरिसच्या प्रतिस्पर्ध्यांची आहे. मॉरिसविरोधात दाखल झालेले गुन्हे राजकीय हेतूनं प्रेरित होते. त्याच्याविरोधात दाखल झालेला अत्याचाराचा गुन्हा त्याच्या शत्रूंनी रचलेल्या कटाचा भाग होता. हा गुन्हा सोडता मॉरिसला कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नव्हती, असं सरीना यांनी सांगितलं.

पण सोशल मीडियावर आता ज्या पद्धतीनं त्याचं चित्र रंगवलं जातंय, तसा तो व्हिलनही नव्हता. तुरुंगातून सुटका झाल्यानंतर मॉरिस प्रचंड दडपणाखाली होता. सामाजिक कार्याशी संबंधित असलेल्या त्याच्या बॅनर्स, पोस्टर्सवर आक्षेप घेण्यात आले. त्याला कार्यक्रम आयोजित करण्यापासून रोखलं जाऊ लागलं होत. मॉरिसला मी कधीच इतक्या दडपणाखाली पाहिलं नव्हतं. माझ्या या परिस्थितीसाठी जबाबदार असणाऱ्यांना मी सोडणार नाही, असं तो म्हणायचा. पण तो असं काही करेल याचा विचारही मी केला नव्हता. अशी माहिती सरीन यांनी दिली.