उत्तर प्रदेश: ज्ञानवापी मशिदीच्या व्यासजी तळघरात गौरी-गणेशाची पूजा-आरती झाल्यानंतर आता भाविकांना तळघराचे दर्शन दिले जात आहे. . सुरक्षेच्या दृष्टीने मोठ्या संख्येने पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. आजच काशी विश्वनाथ मंदिर प्रशासनाने व्यास जी तळघरातील पूजा-आरतीबाबत वेळापत्रक जाहीर केले आहे. व्यास तळघरात दिवसातून पाच वेळा पूजा-आरती होईल. पहिली मंगला आरती पहाटे ३.३० वाजता होईल, तर शेवटची शयन आरती रात्री १० वाजता होईल.
गेल्या बुधवारी वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी व्यास कुटुंबीय शैलेंद्र कुमार पाठक यांच्या प्रस्तावावर निर्णय देताना त्यांना व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याचा अधिकार दिला आहे . सात दिवसांत व्यास तळघरात नियमित पूजा करण्याची व्यवस्था करण्याचे आदेश न्यायालयाने जिल्हा प्रशासनाला दिले. तसेच, व्यास कुटुंब आणि काशी विश्वनाथ मंदिर ट्रस्ट सोबत मिळून तेथे नियमित पूजा करतील असा पुजारी देखील निवडायचे सांगितले आहे.
25 सप्टेंबर 2023 रोजी जेव्हा सोमनाथ व्यास यांचे नातू शैलेंद्र पाठक यांनी व्यासजींच्या तळघरात पूजा करण्याच्या अधिकाराबाबत मागणी केली होती तेव्हा त्यांनी कोर्टाकडे दोन मागण्या केल्या होत्या. व्यास तळघराचा हक्क त्यांना मिळावा ही त्यांची पहिली मागणी होती, तर दुसरी मागणी पूजेबाबत होती. पहिल्या मागणीवर, जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कृष्ण विश्वेश यांनी 17 जानेवारी रोजी निर्णय दिला आणि व्यास तळघराचा रिसीव्हर म्हणून वाराणसी डीएमची नियुक्ती केली. तसेच अंजुमन व्यवस्था मशीद समितीला तळघराच्या चाव्या डीएमला देण्यास सांगण्यात आले.