ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना आम्ही समुद्राच्या तळातून शोधून काढू : राजनाथ सिंह

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी भारतात येणाऱ्या एका व्यावसायिक जहाजावर झालेल्या ड्रोन हल्ल्यावर तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. हा हल्ला भारत सरकार गांभीर्याने घेतला असुन ज्यांनी हा हल्ला केला आहे त्यांना आम्ही समुद्राच्या तळातून शोधून काढू असे राजनाथ सिंह म्हणाले आहेत. विशाखापट्टनम वर्गातील तिसरी युद्धनौका आयएनएस इम्फाळ आज नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. मुंबईतील नौदलाच्या तळावर झालेल्या कार्यक्रमात राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत इम्फाळ युद्धनौकेवर पहिल्यांदाच नौदलाचा ध्वज फडकवण्यात आला. विशाखापट्टनम वर्गात याआधी आयएनएस विशाखापट्टनम आणि मोरमुगाओ या दोन विनाशिका प्रकारातील युद्धनौका नौदलात दाखल झाल्या आहेत.

यावेळी संरक्षण मंत्री म्हणाले की, “गेल्या काही दिवसांत समुद्रात विविध घटनांमध्ये वाढ झाली आहे. आपल्या वाढलेल्या नौदलाच्या ताकदीमुळे काहींचा जळफळाट होत आहे. गेल्या काही दिवसांत भारताच्या मालवाहू जहाजांवर झालेले हल्ले हे गंभीरपणे घेण्यात आलेले आहेत. समुद्रात नौदलाची गस्त आणखी वाढवण्यात आली आहे. या घटनांमागे जे कोणी असतील ते समुद्राच्या तळाशी जरी असले तरी त्यांना आम्ही शोधून काढू असे आश्वासित करतो. देशाच्या जवळून होणारी जलवाहतूक आणि व्पापार हा मित्र देशांच्या मदतीने आम्ही आणखी सुरक्षित करु.” असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत.