तरुण भारत लाईव्ह : सुमारे एक वर्षापासून सुरू असलेल्या रशिया युक्रेन युद्धात जागतिक समुदायाचे लक्ष वेधून घेतील असे अनेक प्रसंग घडले, परंतु रशियाच्या ‘वॅगनर ग्रुपने’ रशियाविरुद्ध केलेले बंड ही या युद्धाला कलाटणी देणारी व कदाचित पुतीन यांच्या राजवटीला धोका ठरू शकेल अशी अलीकडील सर्वात मोठी घटना म्हणावी लागेल. रशिया- युक्रेन युद्धात ‘बाखमुत ‘ येथे कठीण परिस्थितीत रशियाला विजय मिळवून देणारा वॅगनर ग्रुप आता मॉस्को ताब्यात घेण्याची घोषणा करतो आहे.पश्चिमी प्रसार माध्यमांतून दावा केला जातो आहे की वॅगनर ग्रुपने रोस्तोव्ह हे शहर ताब्यात घेतले असून ते युक्रेनमधील रशियाने जिंकलेल्या दोनबास्क भागाचे प्रवेशद्वार आहे. वॅगनर ग्रुपचे लढवय्ये वेगाने मॉस्कोकडे सरकत आहेत, ‘जो मार्गात येईल त्याचा विनाश करू’ अशी धमकी त्यांनी दिली आहे.
वॅगनर ग्रुप काय आहे ?
रशियन सैन्यातील निवृत्त लेफ्टनंट कर्नल दिमित्री युटकीन यांनी वॅगनर ग्रुपची स्थापना केली होती. वॅगनर ग्रुप ज्यालाअधिकृतपणे पीएमसी वॅगनर म्हणतात, ही एक रशियन निमलष्करी संघटना आहे जी रशियामध्ये कायद्याच्या पलीकडे काम करते. ही मुळात खाजगी लष्करी कंपनी आणि भाडोत्री सैनिकांचे नेटवर्क आहे. पूर्व युक्रेन मध्ये रशियन समर्थक फुटिलतावादी शक्तींना पाठिंबा देत असताना २०१४ मध्ये प्रथम या संघटनेची ओळख पटली. त्याआधी वॅगनर ग्रुप गुप्तपणे कार्य करीत होता.
वॅगनर ग्रुप आणि पुतीन
वॅगनर ग्रुपला पुतीन यांचे खाजगी सैन्य म्हटले जात होते. सध्या वॅगनर ग्रुपचे प्रमुख ‘येवगिनी प्रीगोझीन’ हे आहेत. त्यांचे १९९० च्या दशकापासून पुतीन यांच्याशी चांगले संबंध होते. पुतीन व प्रीगोझिन हे एकाच शहराचे म्हणजे सेंटपीटर्सबर्गचे निवासी आहेत. प्रीगोझिनयांनी पुतीन यांचे राजकारणातील महत्त्व वाढत असतानाचा काळ पाहिला आहे. पुतीन यांच्याशी असलेल्या संबंधांचा वापर करूनयेवगिनी प्रीगोझीन यांनी रशियातील उच्च अधिकारी व राजकारणी यांच्याशी निकटता वाढविली व एका आलिशान अशा रेस्तराचे ते मालक बनले.
वॅगनर ग्रुपच्या बंडाचे कारण
जानेवारी२०२३ मध्ये रशियाला युक्रेन युद्धात मोठे यश मिळाले. युक्रेनचे बाखमुत शहर रशियाने ताब्यात घेतले. ही कामगिरी वॅगनर ग्रुपने बजावली होती, परंतु याचे श्रेय मात्र रशियन सैन्याने घेतले. यामुळे वॅगनर ग्रुप संतप्त झाला वॅगनर ग्रुपने आरोप केला की त्यांना बाखमुत मध्ये यश मिळू नये म्हणून पुरेसे शस्त्रास्त्र व दारूगोळा पुरवला गेला नाही. वॅगनर ग्रुपमधील एका सैन्य कंत्राटदाराने एक व्हिडिओ रेकॉर्ड करून शस्त्रास्त्रे न पुरविण्याचा आरोप रशियन सैन्याचे प्रमुख जनरल व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर लावला आहे.
याचबरोबर वॅगनर प्रमुख येवगिनी प्रीगोझीनयांनी रशियाचे संरक्षणमंत्री सर्गेई शोईगु आणि रशियन सैन्य प्रमुख व्हॅलेरी गेरासिमोव्ह यांच्यावर अक्षमतेचा आरोप केला आहे.
रशियाने युक्रेनवर आक्रमण करण्यासाठी जी अधिकृत क्रेमलीन आवृत्ती प्रकाशित केली, त्यावर वॅगनर प्रमुखांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. वॅगनर ग्रुप नुसार रशियाचे संरक्षण मंत्री व सैन्य प्रमुखांनी पुतीन यांची फसवणूक करून त्यांना युक्रेनवर हल्ला करावयास भाग पाडले,जेणेकरून सर्गेई शोईगु यांना ‘मार्शल’ होता येईल व दुसरे ‘हिरो’पदक मिळू शकेल.
सद्यस्थिती
दरम्यान रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी वॅगनार ग्रुपने लष्करी बंड केले असून देश विरोधी कृत्य केले असल्याचे म्हटले आहे, तसेच त्यांचे बंड मोडून काढण्यात येईल असे सांगितले. वॅगनर प्रमुख येवगिनी प्रीगोझीनयांच्या मॉस्को ताब्यात घेण्यात येयील या घोषणेनंतर मॉस्को शहरात येणारे सर्व मार्ग बंद करण्यात आलेले असून दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथमतः मॉस्को शहरामध्ये रस्त्यांवरती रणगाडे, सैन्य ट्रक्स फिरताना दिसत आहेत. शियन उच्च अधिकार्यानुसार मॉस्को शहरात आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. वॅगनर ग्रुपने काही शहरातील लष्करी ठाणे व विमानतळ ताब्यात घेतल्याचा दावा केला असून त्यांच्या ताब्यातील प्रदेशात सर्वकाही सुरळीत सुरु असल्याचा दावा केला आहे.
रशिया युद्धाच्या गर्तेतून अजून काही महिने तरी बाहेर पडेल असे वाटत नाही. यामुळे जगासमोर तेल संकट, अन्न संकट उभे राहू शकते. सदर युद्धामुळे गहू व इंधन यासाठी रशियावर अवलंबून असणाऱ्या अनेक देशांच्या अर्थव्यवस्था कर्जातच्या खाईत लोटल्या जात आहेत व चीन त्याचा फायदा घेतोय. रशिया व पुतिन या संकटाला कसे सामोरे जातात याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.
– शरद पंडित पाटील