मुंबई : करोना केंद्रांसाठी देण्यात आलेल्या कंत्राटातील कथित गैरव्यवहार प्रकरणी ईडीकडून मुंबईत छापेमारे सुरु आहे. ईडीकडून एकाचवेळी 15 ठिकाणी छापेमारी सुरु आहे. यात ज्या लोकांचे कनेक्शन त्यांची चौकशी होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांचे निकटवर्ती म्हणून ओळखले जाणारे सुजीत पाटकर यांच्या मालमत्तेवरही छापा टाकण्यात आला आहे. तर, आदित्य ठाकरेंचे निकटवर्तीय आणि युवासेना पदाधिकारी सूरज चव्हाण यांच्यासह सनदी अधिकारी संजीव जैस्वाल यांच्या घरी ईडीने धाड टाकली आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आलं. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही.”
“ईडीने मुंबईत १५ ठिकाणी छापे टाकले आहेत. यामध्ये संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय सुरज चव्हाण यांचाही समावेश आहे.” यावरून आणखी किती लोकांची चौकशी सुरू आहे, असा प्रश्न विचारला. त्यावर फडणवीस म्हणाले की, “ज्या लोकांचे कनेक्शन असतील त्यांची चौकशी सुरू असेल. यासंदर्भातील अधिकृत माहिती ईडी अधिकारीच देऊ शकतील.”