मुंबई : मराठी रंगभूमीवरील मानाचं समजलं जाणारं आद्य नाटककार विष्णुदास भावे गौरव पदक यंदा ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांना जाहीर करण्यात आलं आहे. ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांनी मराठी चित्रपट, दूरदर्शन, नाट्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्याचसाठी त्यांना रंगभूमीवरील मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.
सांगलीतल्या अखिल महाराष्ट्र नाट्य विद्यामंदिर संस्थेच्या वतीनं रंगभूमी दिनाचं औचित्य साधून दरवर्षी विष्णूदास भावे गौरव पुरस्कार प्रदान करण्यात येतो. मागील वर्षी हा पुरस्कार अभिनेते प्रशांत दामले यांना प्रदान करण्यात आला होता.
येत्या 5 नोव्हेंबर रोजी रंगभूमीदिनाचे औचित्य साधून हा पुरस्कार दिला जाईल. त्याचप्रमाणे यंदा दिलं जाणारा हा 57 वा गौरव पुरस्कार आहे. या पुरस्कार रोख रक्कम 25 हजारांसह स्मृतीचिन्ह, शाल आणि श्रीफळ असं या पुरस्काराचं स्वरुप असेल. सुहास जोशी यांनी आजवर अनेक सिनेमे, नाटकं, मालिका यांमधून प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं आहे. त्यांच्या याच कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.