टँकरच्या धडकेत शेतकऱ्यासह म्हैस ठार, संतप्त नागरिकांनी केले रस्ता आंदोलन

 जळगाव : शेतशिवारातून म्हैस घरी आणत असताना भरधाव टँकरने धडक दिल्याने शेतकरी सुकलाल पंडित सोनवणे यांच्यासह त्यांच्या मालकीच्या म्हशीचा जागीच मृत्यू झाला. विटनेर येथे नेरीकडून म्हसावदकडे जाणाऱ्या रस्त्यावर ही घटना मंगळवार 19 रोजी दुपारी घडली. केमिकल घेवून जाणारा टँकर क्र.जी.जे. 12 बी.व्ही. 7475 भरधाव वेगाने येताना धडक दिली. या अपघातात सुकलाल पंडित यांच्यासह म्हैस जागीच मृत झाली.परिसरातील संतप्त ग्रामस्थानी घटनास्थळी धाव घेत बैठा आंदोलनाला सुरुवात केली.

त्यामुळे हा मार्ग तब्बल तीन तास ठप्प होवून वाहतूक विस्कळीत झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विटनेर गावात मोठ्या प्रमाणात पशुपालक राहतात. दुसरीकडे परिसरात नेहमी भरधाव वेगाने वाहन धावत असल्याने अपघाताला निमंत्रण मिळते,अशा तक्रारीचा सूर ग्रामस्थांनी लावला. या घटनेने परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.एमआयडीसी पोलिसांनी अपघात ठिकाणी जावून शेतकऱ्याचा मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात हलविला. ग्रामस्थांची समजूत घालून वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी चालकाविरुध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.