टाटा समूहाचा एअरबस सोबत करार ! संयुक्तपणे सिंगल इंजिन हेलिकॉप्टर बनवणार ; गुजरातमध्ये होणार निर्मिती

टाटा समूह :  फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन सध्या भारत दौऱ्यावर होते. ते भारताच्या 75 व्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला देखील उपस्थित होते. यावेळी टाटा समूहाने विमान निर्मिती कंपनी एअरबससोबत करार केला आहे. हा करार देशात सिंगल इंजिन हेलिकॉप्टर आणि इतर विमानांच्या निर्मितीसाठी आहे.

फ्रान्स आणि भारत यांच्यातील वाढत्या संबंधांमुळे विशेषत: संरक्षण, अणुऊर्जा आणि अवकाश या क्षेत्रांमध्ये राजकीय संबंध मजबूत होण्यास हातभार लागला आहे. 2023 मध्ये, पंतप्रधान मोदी फ्रान्समधील बॅस्टिल डे समारंभाला उपस्थित राहिले होते, त्या दरम्यान पानबुडी आणि राफेल लढाऊ विमाने खरेदी करण्याचा करार झाला होता.

टाटा ग्रुपने व्यावसायिक वापरासाठी एअरबस H125 सिंगल-इंजिन हेलिकॉप्टरची संयुक्तपणे निर्मिती करण्याचा करार केला आहे. गुजरातमधील वडोदरा येथे याचे उत्पादन होईल. दोन्ही कंपन्या किमान चाळीस C-295 वाहतूक विमाने तयार करतील.

या करारानुसार बनवले जाणारे हेलिकॉप्टर व्यावसायिक वापरासाठी असतील. टाटा समूहाची टाटा ॲडव्हान्स्ड सिस्टीम्स लिमिटेड कंपनी (TASL) या हेलिकॉप्टरच्या असेंब्ली लाइनचे व्यवस्थापन करेल. खरेदीदारांकडून बाजारात आधीच 600 ते 800 हेलिकॉप्टरची मागणी आहे. या हेलिकॉप्टरची निर्मिती गुजरातमधील वडोदरा येथे केली जाणार आहे.