लोहारा, ता. पाचोरा : टेम्पोने धडक दिल्याने झालेल्या अपघातात येथील रहिवासी गुणवंत दत्तात्रय क्षीरसागर (४४) यांचा मंगळवारी मृत्यू झाला. ते शेंदुर्णी येथील राणी लक्ष्मीबाई पतसंस्थेत कार्यरत होते. लोहारा-शेंदुर्णी दरम्यान ते दररोज ये-जा करीत असत. सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जात असताना दहाला शेंदुर्णीकडून कळमसराकडे येत असलेला दूध वाहतूक करणारा टेम्पो एम.एच.१९ सीवाय ५७३१ भरघाव वेगात असल्याने कळमसरा शिवारात आत्माराम सीताराम चौधरी यांच्या शेताजवळ समोरून येणाऱ्या प्लेटिना म ोटरसायकल एम.एच.१९ डी.एन.७६६२ ला जोरदार धडक दिली. त्यात म ोटारसायकलस्वार गुणवंत क्षीरसागर जागीच ठार झाले.
घटनास्थळीपिंपळगाव पोलीस स्टेशनचे पी.एस.आय. अमोल पवार, हेड कॉन्स्टेबल अरविंद मोरे, लोहारा पोलीस पाटील सुरेंद्र शेळके यांनी पंचनामा करून शवविच्छेदनासाठी पाचोरा येथे पाठविले. गुणवंत क्षीरसागर हे लोहारा येथील माजी सरपंच दत्तात्रय भिका क्षीरसागर यांचे चिरंजीव तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख होते. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.लोहारा येथील सर्व व्यावसायिक आपले दुकाने बंद करून क्षीरसागर कुटुंबाच्या दुःखात सहभागी झाल्याचे दिसून आले. मयताच्या पश्चात आई- वडील, भाऊ, बहीण, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्यावर मंगळवारी सायंकाळी लोहारा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.