एरंडोल : एरंडोलकडून भडगावकडे जाणाऱ्या दुचाकीला भडगावकडून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून कट मारल्याने दुचाकीवर मागे बसलेला अरुण काळू मराठे (वय 39, रा. वेल्हाणे, ता. धुळे हा रस्त्यावर खाली पडला व ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. ही घटना 17 डिसेंबर रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास खडके खुर्दपासून एक किलोमीटर अंतरावर एरंडोल-कासोदा रस्त्यावर घडली. अनिल रघुनाथ पाटील व अरुण काळू मराठे हे दोघे एम.एच. 18 बी डब्ल्यू 1836 क्रमांकाच्या बजाज कंपनीच्या दुचाकीने अरुण मराठे याच्या नातेवाईकाच्या लग्नात जळगाव येथे गेले.
लग्नाला हजेरी लावून साधारणपणे दीड वाजेच्या सुमारास ते अनिल पाटील यांच्या वलवाडी, ता.भडगाव येथील सासरवाडीस जात असताना खडके खुर्द गावापासून एक किलोमीटर अंतरावर वळणावर भडगावकडून येणाऱ्या एम एच 18 बीजी 3240 क्रमांकाच्या ट्रकने कट मारला. त्यामुळे मागे बसलेला अरुण मराठे हा रस्त्यावरून खाली फेकला गेला. ट्रकचे मागील चाक त्याच्या डोक्यावरून गेल्याने तो जागीच ठार झाला. अनिल पाटील हा दुचाकी चालवत होता. या दुर्घटनेत अनिल पाटीलसुद्धा जखमी झाला आहे. याप्रकरणी एरंडोल पोलीस स्टेशनला रविवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. एरंडोल पोलीस स्टेशनचे पीएसआय विकास देशमुख, किरण पाटील हे पुढील तपास करीत आहेत