जामनेर (शेंदुर्णी): तालुक्यातील राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे मोठे नेते मानले जाणारे संजयदादा गरूड यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेशाचा निर्णय घेतला असून मंगळवारी ते ना. गिरीशभाऊ महाजन यांच्या साथीने आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
जामनेर मतदारसंघातून ना. गिरीश महाजन यांना तीन वेळेस अतिशय तगडे आव्हान उभे करणारे आधी कॉंग्रेसचे तर नंतर राष्ट्रवादी आणि अलीकडेच शरद पवार गटात असलेले नेते संजय गरूड यांनी आता राजकीय कारकिर्दीतील सर्वात मोठा निर्णय घेतला आहे. खरं तर, गेल्या अनेक महिन्यांपासून या निर्णयावर त्यांचा विचार सुरू होता, मग त्यांनी आपल्या निकटवर्तीयांच्या सोबत चर्चा केली. नंतर आपल्या समर्थकांची मोठी बैठक घेऊन त्यांनी मते जाणून घेतली. यात त्यांनी दोन दिवसात निर्णय घेण्याचे जाहीर केले होते.
या अनुषंगाने संजयदादा गरूड यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचा राजीनामा दिला असून ते मंगळवार दिनांक ३० जानेवारी २०२४ रोजी मुंबई येथील भव्य कार्यक्रमात आपल्या हजारो समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. यामुळे जामनेर विधानसभा आणि रावेर लोकसभा निवडणुकीत संजयदादा गरूड यांच्या भाजप प्रवेशाने पक्षाला मोठी ताकद मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.