ठाकरे गटाला मोठा धक्का ; जळगावातील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांचा शिंदे गटात प्रवेश

जळगाव ।  लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसलाय. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह 400 कार्यकर्त्यांनी शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यामुळे जळगावात ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास 400 कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील , बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व माजी आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते.

हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनातून बुलढाण्यात पोहोचले होते. बुलढाणामधील रेसिडेन्सी क्लब येथे सदर पक्षप्रवेश पार पडला असून यामुळे जळगाव जिल्ह्यात ठाकरे गटाला आणि शदर पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.

दरम्यान, काही दिवसापूर्वी भाजपचे जळगावचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील, नगराध्यक्ष करण पवार आणि त्याचे अनेक सहकारी, पदाधिकारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मातोश्रीवर पक्षप्रवेश केला. उन्मेष पाटलांच्या ठाकरे गटात प्रवेशामुळे जळगावची निवडणूक अधिक रंगतदार होणार आहे. भाजपने जळगाव मतदारसंघातून विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांचं तिकीट कापलं. जळगाव मतदारसंघातून भाजपने ऐनवेळी उन्मेष पाटलांचा पत्ता कापत स्मिता वाघ यांना उमेदवारी दिली. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवार जाहीर केल्यानंतर उन्मेष पाटील नाराज असल्याचं समोर आलं होतं.