आता हॅकिंग आणि ऑनलाईन फ्रॉड सारख्या घटनांना लागणार चाप; डिजिटल सुरक्षा वाढणार!

नवी दिल्ली : एआय सारख्या नवतंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे उद्भवणाऱ्या समस्यांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकार नवे पाऊल उचलण्याच्या तयारीत आहे. डिजिटल इंडिया बिल हे केंद्र सरकारकडून डिजिटल सुरक्षेसाठी नवीन विधेयक आणण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे. या विधेयकामुळे तंत्रज्ञानाविषयक नवीन समस्यांना नव्या पध्दतीने हाताळता येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, हॅकिंगसारख्या समस्या वाढल्या असून एआय वापरून बनावट व्हिडिओ बनवले जातात. त्याचबरोबर, ऑनलाइन फसवणुकीच्या अनेक घटना पाहायवास मिळत असून यूट्यूबसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे खोट्या बातम्या पसरवणाऱ्यांमध्ये दिवसागणीक वाढ होताना दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता सरकार डिजिटल सुरक्षेसाठी एक विधेयक आणले जाणार आहे.

आगामी अधिवेशनात संसदेत एआय चा वापर अधिक चांगल्या प्रकारे कसा करू शकतो यावर देखील चर्चा करण्यात येणार आहे. दरम्यान, विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी सर्वपक्षीयांशी चर्चा करून एकमत घडवण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यानंतरच अधिवेशनातच ते मांडले जाऊ शकते. विशेष म्हणजे १८ व्या लोकसभेचे पहिले अधिवेशन दि. २४ जून २०२४ पासून सुरू होणार असून ते ०३ जुलैपर्यंत चालणार आहे. मात्र, त्यानंतर पावसाळी अधिवेशन दि. २२ जुलैला सुरू होणार असून ते ०९ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

डिजिटल इंडियाच्या अनुषंगाने महत्त्वाचे असणारे विधेयक याआधी घडलेल्या डीपफेक व्हिडिओ व ऑनलाइन फेक न्यूज यासंदर्भात आळा घालण्यास उपयुक्त ठरण्याची शक्यता आहे. त्याचप्रमाणे, डेटा संरक्षणानंतर आता युट्युब व एआयवर नजर ठेवण्यासाठी सरकारकडून हालचाली वाढल्या आहेत. या डीपफेक व्हिडीओ अंतर्गत अमिताभ बच्चन, सचिन तेंडुलकर, रश्मिका मंदान्ना, आलिया भट्ट आणि आमिर खानसुद्धा डीपफेकचे बळी ठरले आहेत. या विधेयकामुळे कुणालाही बदनाम करण्याच्या प्रयत्नांना आळा बसणार आहे.