पाचोरा : शहरातील एका हॉस्पिटलमध्ये शिंदाड येथील महिलेवर झालेल्या उपचारावरून वाद घालीत डॉक्टरवर हल्ला करून कानशीलात मारल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाचोरा पोलिसात आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पाचोरा-भडगाव रोडवरील सावणेरकर हॉस्पिटलमध्ये २१ डिसेंबर रोजी सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास डॉ. मुकुंद सावणेरकर हे पेशंट चेक करीत असताना आठ अनोळखी इसमांनी एकत्रित येऊन गैरकायद्याची मंडळी जमवून शिंदाड येथील महिला पेशंट भाग्यश्री एकनाथ पाटील हिचेवर झालेल्या उपचारावरून डॉ. सावणेरकर यांच्याशी वाद घालून त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्या उजव्या कानशिलात मारली. या घटनेप्रकरणी डॉ. मुकुंद सावणेरकर यांनी पाचोरा पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून शिंदाड येथील आरोपी भागवत रुपचंद पाटील यांच्यासह सात अनोळखी इसमांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक राहुल खताळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक योगेश गणगे करीत आहेत.