जळगाव : रावेर लोकसभा मतदार संघ हादेखील गेल्या अनेक पंचवार्षिक्यासून भाजपचा बालेकिल्ला ठरला आहे. या मतदारसंघात विद्यमान खासदार रक्षा खडसे यांना पुन्हा संधी न मिळाल्यास त्यांच्या जागी पक्षात नव्याने आलेल्या डॉ. केतकी पाटील यांना संधी मिळू शकते. तसेच या मतदारसंघात पक्षाचे पदाधिकारी अमोल जावळे, डॉ. कुंदन फेगडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
जिल्ह्यात जळगाव व रावेर हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ गेल्या अनेक वर्षांपासून आपल्याकडे राखण्यात भाजपला यश आले आहे. या मतदार संघात चोपडा, रावेर, भुसावळ, जामनेर, मुक्ताईनगर, मलकापूर हे विधानसभा मतदार संघ येतात. यातील रावेर व मलकापूर मतदार संघात काँग्रेसचे आमदार आहेत. तर जामनेर व भुसावळ विधानसभा मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. मुक्ताईनगर विधानसभा मतदार संघात अपक्ष आमदार आहेत मात्र आ. चंद्रकांत पाटील हे शिंदे गटात आल्याने ते भाजप युतीकडेच आहेत.
सध्यास्थितीत भाजपकडे विविध राजकीय पक्षाच्या प्रमुख कार्यकर्त्यांची प्रवेशाची धांदल सुरू आहे. अनेक दिग्गज या पक्षात आले आहेत. जळगाव जिल्ह्याचा विचार करता मागील लोकसभेच्या वेळी काँग्रेस आघाडीचे उमेदवार असलेले डॉ. उल्हास पाटील व त्यांच्या कन्या डॉ. केतकी पाटील या भाजपात दाखल झाले आहेत. डॉ. उल्हास पाटील व डॉ. केतकी पाटील यांच्या प्रवेशाने या मतदार संघात राजकीय समिकरणे बदलली आहेत. मतदार संघातील उमेदवारीसाठी यामुळे स्पर्धा निर्माण झाली आहे. यासह पक्षाचे पदाधिकारी असलेले अमोल जावळे, डॉ. कुंदन पेगडे यांचीही नावे चर्चेत आहेत.
भाजपच्या विरोधात इंडिया आघाडीकडून कुणाला उमेदवारी दिली जाते हा उत्सुकतेचा विषय ठरणार आहे. या मतदार संघात माजी मंत्री आमदार एकनाथराव खडसे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. मात्र वैद्यकीय सल्त्यानंतरच उमेदवारी निश्चित करू असे खडसे यांनी म्हटले आहे. ते नसल्यास चोपड्याचे माजी आमदार कैलास पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अड. रवींद्रभैय्या पाटील यांचीही नावे चर्चेत आहेत. आमदार एकनाथराव खडसे यांच्या भूमिकेवरच पुढील समिकरणे अवलंबून आहेत. भाजपातील इच्छूकांकडून मोर्चे बांधणी सुरू आहे. मात्र विरोधी गटात तशी उत्सुकता दिसत नाही.
जिल्ह्याच्याच नव्हे तर राज्याच्या राजकारणातील दोन दिग्गज नेत्यांचे मोठे शक्तीप्रदर्शन या जिल्ह्यात होणार आहे. जिल्हा दूध संघ, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत आमदार एकनाथराव खडसे यांना ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी यश मिळू दिले नाही, डावपेचात ते उजवे ठरले हे कोणीही नाकारू शकत नाही. आता या दोन्ही नेत्यांचे शक्तीप्रदर्शन लोकसभा निवडणुकीत असेल त्यामुळे केवळ जिल्हाच नव्हे तर राज्याचे लक्ष या मतदार संघावर असेल, टक्कर काट्याचीच होईल. फक्त उमेदवार कोण यावर पुढील रणनिती ठरणार आहे. त्यातच डॉ. उल्हास पाटील हेदेखील भाजप सोबत आल्याने सामाजिक समिकरणेदेखील बदलणार आहेत.