नवापूर : लोकनेते माणिकराव गावित यांचे राहणीमान अत्यंत साधे होते, मात्र राजकीय जीवनात सर्वांना सोबत घेऊन ते चांगले कार्य करीत राहिले. एकाच मतदारसंघातून सतत नऊ वेळा निवडून येणारे एकमेव खासदार म्हणून आपल्या मतदारसंघाचा नावलौकिक आहे. त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण झाली ती भरून काढण्याचे काम आता माजी आमदार निर्मला गावित, जिल्हा परिषद सदस्य भरत गावित व संगीता गावित करीत आहेत. लोकनेते माणिकराव गावित यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली स्मरणिका निश्चितच येणाऱ्या भावी पिढीला प्रेरणादायी आणि मार्गदर्शक ठरणार, असे प्रतिपादन आदिवासी विकासमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी केले.
लोकनेते माणिकराव गावित यांच्या 89व्या जयंतीनिमित्त प्रारंभी सकाळी सुमाणिक फार्महाऊस येथील समाधीस्थळी माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, माजी आमदार निर्मला गावित, डोकारे आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भरत गावित, महिला व बालकल्याण सभापती संगीता गावित, युवा उद्योजक धनंजय गावित, प्राचार्या जयश्री गावित, नीता वसावे, निवृत्त कार्यकारी अभियंता रमेश गावित, प्रकाश गावित, अजय गावित आदींसह सुमाणिक गावित परिवाराने दर्शन घेऊन पुष्प अर्पण करून अभिवादन केले. त्यांच्या जीवनावर आधारित ‘सबसे साधा माणिकदादा’ स्मरणिकेचे प्रकाशन नंदुरबार, धुळे व नाशिक जिल्ह्यातील मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी झाले. त्यावेळी डॉ. गावित बोलत होते.माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, की माणिकराव गावित यांच्या आशीर्वादानेच माझा राजकीय जन्म झाला. असंख्य कार्यकर्ते त्यांनी घडविले. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात माजी मंत्री सुरूपसिंग नाईक आणि माणिकराव गावित यांची जोडी म्हणजे जय आणि वीरूची जोडी होती.
माजी मंत्री सुरूपसिंग नाईक, खासदार डॉ. हीना गावित, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, भास्कर गुंजाळ, कचरू पाटील, रमेश श्रीखंडे, जी. के. पठाण, झेलसिंग पावरा, माजी नगराध्यक्षा हेमलता पाटील, धुळे काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ गुरव, विलास देसले, इंजि. अरुणकुमार गावित, सुमित्रा गावित, पुष्पा गावित, आदिवासी साखर कारखान्याचे तज्ज्ञ संचालक जयवंत जाधव, आरिफ बलेसरिया, गुलाम व्होरा, कुंवरसिंग वळवी, विक्रमसिंग गावित, सुनील गावित, शांताराम पाटील, भाजप तालुकाध्यक्ष सत्यानंद गावित, उपाध्यक्ष जगन कोकणी, प्रकाश पाटील, पोपटराव सोनवणे, नरेंद्र नगराळे, चंद्रकांत नगराळे, हरीश पाटील आदी उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य भरत गावित यांनी प्रास्ताविक केले. दिलीप गावित व महेंद्र पाटील यांनी सूत्रसंचालन केले. माजी आमदार निर्मला गावित यांनी आभार मानले.