पाचोरा : तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील हातमजुरी करणाऱ्या इसमाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना ४ रोजी रात्री घडली. या घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांकडून प्राप्त माहिती अशी की, पाचोरा तालुक्यातील खेडगाव (नंदीचे) येथील प्रकाश पाटील हे हातमजुरी करुन आपला व आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह चालवित होते.४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास प्रकाश पाटील यांनी राहत्या घरात गळफास लावून आपली जीवनयात्रा संपविल्याची घटना समोर आली आहे.
हा प्रकार कुटुंबियांच्या लक्षात येताच त्यांनी एकच आक्रोश केला. प्रकाश पाटील यांना तत्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी प्रकाश पाटील यांना मृत घोषित केले.प्रकाश पाटील यांचेवर ४ ते ५ लाख रुपये कर्ज झाले असत्याची गावात चर्चा होती.डोक्यावर कर्जाचा डोंगर असल्यानेच प्रकाश पाटील यांनी आत्महत्या केली असावी, अशीदेखील गावात चर्चा होती. मयत प्रकाश पाटील यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी असा परिवार आहे. प्रकाश पाटील यांच्या अकस्मात मृत्यूने खेडगाव (नंदीचे) गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल विकास खैरे हे करीत आहे