मुक्ताईनगर । ड्युटी आटोपून घराकडे निघालेल्या मुक्ताईनगरातील तरुणावर काळाने झडप घातली. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत शुभम राजू उंबरकार ( वय 22, रा. मुक्ताईनगर) या तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज शुक्रवारी पहाटे घडली. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेबाबत असे की, वल्लभभाई पटेल नगरातील रहिवासी शुभम राजू उंबरकार हा पिंप्री अकाराऊत येथील पद्मश्री लॉन येथे ड्रायव्हर म्हणून कार्यरत होता. आज पहाटे एक वाजेच्या सुमारास तो कामावरून आपल्या घरी परत येण्यासाठी एमएच19 डीएक्स 9412 क्रमांकाच्या होंडा शाईन या दुचाकीने निघाला होता. तो घोडसगाव येथील उड्डाणपुलावर आला असता कोणत्या तरी अज्ञात वाहनाने त्याला धडक दिली. यात तो जायबंदी झाला.
परिसरातील नागरिकांनी अपघातस्थळी धाव घेऊन रूग्णवाहिका बोलावली. येथून त्यांच्या मामांशी संपर्क करून याबाबतची माहिती देण्यात आली. कुटुंबियांनी तात्काळी अपघातस्थळी धाव घेऊन शुभम याला उपचारासाठी उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. मात्र यापूवच त्याची प्राणज्योत मालवली होती. या प्रकरणी मयत युवकाचे मामा संतोष मधुकर सोनार यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात वाहनचालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.