जळगाव : हॉस्पिटलमध्ये ड्यूटीवर गेलेल्या परिचारिका महिलेच्या कुलूप बंद घराचा कोयंडा कापून चोरट्यांनी एन्ट्री केली. लोखंडी कपाटातील सामान बेडरुममध्ये अस्तव्यस्त फेकला त्यानंतर किचन ओटा खाली ठेवलेली गोणी उपसत त्यामध्ये ठेवलेले साडेसात तोळ्याचे सोन्याचे दागिने, देवघरातील चांदीच्या देवाच्या मूर्ती असा मुद्देमाल घेऊन चोरटे पसार झाले. भोईटेनगर परिसरात ही घरफोडी झाली. शेजाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हा प्रकार सकाळी सात वाजता उघडकीस आला.
अनिता रमेश दप्तरी (७३) या महिला भोईटेनगरात गुरुपार्क प्लॉट नं. ९४ सी याठिकाणी राहतात. त्यांचे पतीचे दोन वर्षापूर्वी निधन झाले असून, त्या शहरात खाजगी हॉस्पिटलमध्ये परिचारिका म्हणून कार्यरत आहेत. बुधवार, ४ रोजी संध्याकाळी घराच्या दरवाजाला कुलूप लावून त्या ड्यूटीवर गेल्या. मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी या बंद घराकडे मोर्चा वळविला. कोयंडा अस्तव्यस्त फेकला. त्यानंतर किचन रुममध्ये चोरट्यांनी शोध मोहित सुरू केली. किचन ओट्याखाली सिलेंडरच्या बाजुला बांधलेली गोणी होती. ही गोणी सोडून चोरट्यांनी त्यातील सामान बाहेर काढला. या गोणीमध्ये फडक्यामध्ये बांधलेली एक लहानसे गाठोडे चोरट्यांचे हाती लागले.
मुद्देमाल हाती लागल्यानंतर चोरट्यांनी बेडरुम तसेच किचन रुममध्ये भरपूर प्रमाणात पाणी टाकले. पोलिसांना कोणतेही ठसे मिळू नये, याची खबरदारी चोरट्यांनी घेतल्याचे या प्रकारातून समोर आले. सकाळी सात वाजता शेजारील नागरिकांना परिचारिकेच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा कापलेला दिसला. त्यांनी तत्काळ फोन करुन त्यांना माहिती दिली.
खबर मिळताच शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी, डीबी कर्मचारी, श्वान पथक, फिंगर प्रिंट तज्ञ भोईटेनगरात दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. श्वानपथकाने घरापासून लांबपर्यत मार्ग दाखविला. त्याठिकाणाहून चोरटे वाहनातून पसार झाले असण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परिसरात सीसीटीव्हीचाही पोलिसांनी शोध घेतला. या प्रकरणी तक्रारीनुसार शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
डब्यातील रोकड जशीच्या तशी
मंगळवार, ३ रोजी परिचारिकेला पगार मिळाला होता. हे पगाराचे पैसे त्यांनी किचनमधील एका स्टीलच्या डब्यात ठेवले होते. या पैश्यांना चोरट्यांनी हात लावला नाही. दुसऱ्या एका डब्यात नेहमी वापरासाठी शंभर रुपयांच्या नोटा ठेवल्या होत्या. त्यानांही चोरट्यांनी स्पर्श केला नसल्याची माहिती अनिता दप्तरी यांनी दिली.
गाठोड्यातील दागिने चोरले
या गाठोड्यात महिलेने दोन तोळ्याचा चपला हार, २६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या, दीड ग्रॅम वजनाची चैन, पाच ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी असा सुमारे साडेसात तोळे वजनाचे दागिने चोरट्यांनी चोरुन नेले. देवघरात ठेवलेला चांदीचा गणपती, चांदीचा महादेव तसेच चांदीचा पेला. चांदीची वाटी, निरंजन, चार नग चांदीचे करंडे हेही चोरुन नेले.