जळगाव । जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसापासून उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले. मात्र रविवारी जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट दिसून आली. यामुळे काहीशा प्रमाणात जळगावकरांना दिलासा मिळाला. जिल्ह्यात आगामी काही दिवस ढगाळ वातावरण असले तरी उष्णतेपासून मात्र काही दिलासा मिळणार नाही.
कारण, आगामी आठवड्यात पुन्हा तापमानाचा पारा ४३ अंशांपर्यंत राहणार आहे. हवामान खात्याने रविवारी जिल्ह्यात पावसाची शक्यता वर्तविली होती.त्यानुसार तुरळक ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. काल रविवारी तापमानात घट होऊन, दिवसभर ढगाळ वातावरण कायम राहिले होते. त्यामुळे जळगावकरांना काही अंशी दिलासा मिळाला, मात्र, हा दिलासा केवळ एका दिवसापुरताच राहण्याची शक्यता आहे.
आगामी आठवड्याभरात तापमानाचा पारा ४३ अंशापर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आहे. जिल्ह्यात आगामी आठवडाभर उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज असल्यामुळे दिवसाचा पारा सतत पाच ते सहा दिवस ४२ अंशाच्या पुढेच राहण्याची शक्यता आहे. यासह रात्रीच्या तापमानातही वाढ होणार आहे. दरम्यान,आज सोमवारी देखील सकाळपासून ढगाळ वातवरण आहे.
असे राहणार आगामी पाच दिवस तापमान
२२ एप्रिल रोजी तापमान ४१ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२३ रोजी तापमान ४२ अंश, मुख्यत निरभ्र आकाश, सायंकाळनंतर मात्र काही अंशी ढगाळ वातावरण
२४ एप्रिल रोजी तापमान ४२ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२५ रोजी तापमान ४३ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील
२६ रोजी तापमान ४३ अंश, काही अंशी ढगाळ वातावरण राहील