जळगाव : अवजड वाहनांना बंदी असतानाही एक परप्रांतीय वाहन चालक थेट ट्रक घेऊन जळगाव शहरात घुसला. दरम्यान, दारुच्या नशेत त्याने तीन ते चार दुचाकीस्वारांना, तसेच बसला धडक दिली. मात्र, सुदैवाने यापूर्वीच नागरिकांनी हा ट्रक थांबवून चालकाला खाली उतरवून चांगलाच चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. हा प्रकार सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडला.
जळगाव शहरातील नवीपेठ भागातील गोलाणी मार्केट ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक दरम्यान असलेल्या विद्या निकेतन महाविद्यालयाजवळून ट्रक क्रमांक (एचएच ३४ एव्ही १४५३) जात होता. या ट्रकवरील चालक याने मद्य प्राशन केलेले होते. यावेळी त्याने दारुच्या नशेत बस आणि इतर पाच दुचाकींना धडक दिली. या अपघातात काहीजण किरकोळ जखमी झाले आहेत. दरम्यान, अशा परिस्थितीत अपघातावरीन नियंत्रण सुटले असते तर मोठी दुर्घटना घडली असती, असे प्रत्यक्षदर्शी यांनी सांगितलं.
यावेळी काही सुज्ञ नागरीक आणि तरुणांच्या सहकार्याने ट्रक विद्या निकेतन महाविद्यालयाजवळ मद्य धुंद चालकाला खाली उतरविले. तसेच, ट्रकच्या धडकेमुळे जखमी झालेल्या संतप्त दुचाकीस्वार आणि इतरांनी ट्रकचालकाला कपडे फाटेपर्यंत चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी होवून वाहतूक विस्कळीत झाली होती.