‘तरुण भारत’च्या फराळ अभियानाने ओलांडली राज्याची सीमा

जळगाव : ‘दिवाळी फराळाला घरी या, स्नेह सुसंवाद वाढवू या’ हे ‘तरुण भारत’चे दिवाळी फराळ अभियान आता खान्देशच नव्हे तर राज्याची सीमा ओलांडून परराज्यात पोहोचले आहे. खान्देशातील मूळ रहिवासी तथा अस्थायी स्वरुपात स्थायिक झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी बंगळुरू शहरातील कर्नाटका व्हाईटफील्ड सिद्धपुुरा येथील व्हाईटफील्ड परिमला सिनियर सिटीजन ग्रुपने दिवाळीत हे अभियान राबविले. विशेष म्हणजे अभियानात सहभागी झालेले सर्व सेवानिवृत्त आहेत. यात देशाच्या विविध राज्यांमधून आलेले नागरिक सहभागी झाले.

जळगाव येथील मू. जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त प्राध्यापक एस. व्ही. सोमवंशी यांची कन्या बंगळुरूमध्ये वैद्यकीय व्यवसाय करते तर जावई आयटी इंजिनियर आहेत. प्रा. सोमवंशी सध्या बंगळुरूमध्ये आलेले आहेत. ‘जळगाव तरुण भारत’च्या उपक्रमाची माहिती त्यांनी बंगळुरूमधील मित्रमंडळी, ज्येष्ठांना दिली. ‘तरुण भारत’मधील बातम्या तसेच अग्रलेखावर येथे ग्रुपमध्ये हिंदी आणि इंग्रजीत चर्चा होत असते. देशातील वेगवेगळ्या राज्यातील नागरिक ‘व्हाईटफील्ड परिमला सिनियर सिटीजन ग्रुप’ या ग्रुपमध्ये सदस्य आहेत. इतरही वेळेस आम्ही एकत्र येत असतो. पण दिवाळीत खास करून फराळाच्या निमित्ताने सर्वांनी छानपैकी एन्जॉय केला, असे ते म्हणाले.

सिद्धपुरा येथील परिमला सनरीज या अपार्टमेंटमध्ये सेवानिवृत्त प्राध्यापक रमेश श्रीवास्तव (अलाहाबाद) यांच्या डी 303 या फ्लॅटमध्ये ‘जळगाव तरुण भारत’चे फराळ अभियान पार पडले. यावेळी एम. एस. एम. मंत्रालयातील सेवानिवृत्त सल्लागार सुधीर हरदास (हैद्राबाद), कोलकात्यातील व्यावसायिक आर. के. लढ्ढा, उडुपी (कर्नाटका) येथील व्यावसायिक वेंकटेश भट, विजापूर (कर्नाटक) येथील रहिवासी सेवानिवृत्त प्रा. गुरुराज पदफालगी, मुंबईस्थित इंजिनियर कोचिंग सेंटरचे संचालक मधुसूदन गोर, अलाहाबादचे सेवानिवृत्त प्रा. रमेश श्रीवास्तव, नवी दिल्लीतून निवृत्त झालेले नारायण स्वरुप गर्ग व जळगावचे प्रा. एस. व्ही. सोमवंशी यांनी दिवाळी फराळाचा आनंद घेतला. सोबतच छानपैकी गप्पाही मारल्या.