बीड : मनोज जरांगे पाटील जर शिवाजी महाराजांचा विचार घेऊन पुढे येत असतील, तर आपण त्यांना सहकार्य केलं पाहिजे असे विधान राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केले. ते बीडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या प्रचारासाठी आले असता त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
शरद पवार पुढे म्हणाले की, मनोज जरांगे असोत कि आणखी कोणी शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा, ऐक्याचा विचाराला आपण सर्वानी सहकार्य केले पाहिजे. मनोज जरांगे पाटील यांचे धोरण काय? हे समजून घेण्यासाठी मी आणि राजेश टोपे जरांगे पाटलांना भेटलो. शिवाय यावेळी मी त्यांना एक विनंती केली की, राज्यातील सर्व जाती-धर्मातील लोकांना सोबत घेऊन सामाजिक ऐक्य आपण मजबूत ठेऊ. बीड जिल्ह्यात दुष्काळासारखी अनेक संकटं असतील परंतु मनाने अतिशय दिलदार लोकांचा हा जिल्हा आहे. एकदा या जिल्ह्यामध्ये मी विनंती केली आणि विनंतीला मान देऊन जिल्ह्याने सर्वच्या सर्व आमदार आमच्या पक्षाचे निवडून दिले. आमदार सगळे आपले पण सत्ता दुसरीकडे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लोकांचं दुखणं कमी कसं करायचं? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.
पुढे बोलताना पवार म्हणाले, मला केंद्रात काम करण्याची संधी मिळाली. त्यावेळी मी बीडमधील एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. त्याची आज व्यासपीठावर बसल्यानंतर जुन्या लोकांची आठवण झाली. या जिल्ह्याने क्रांतीसिंह नाना पाटलांना मोठ्या मताधिक्याने विजयी केलं. नाना पाटील सातारचे होते पण उभे बीड जिल्ह्यात राहिले. या निवडणुकीत आम्ही कुठेही उमेदवार दिला नाही किंवा कुठल्या पक्षाला पाठिंबा दिला नाही. ही निवडणूक मराठा समाज आपल्या हातात घेईल आणि ज्याला पाडायचे आहे, त्याला नक्कीच पाडेल असं वक्तव्य मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केलं होतं. शिवाय उमेदवार होण्यापेक्षा उमेदवार पाडणारे बना, त्यात मोठा विजय आहे, असं सूचक वक्तव्यदेखील पाटील यांनी केलं होतं. त्यामुळे त्यांचा रोष सत्ताधाऱ्यांवर आहे हे लपून राहिलं नव्हतं. अशातच ऐन निवडणुकीच्या काळात पवारांनी जरांगेबाबत केलेल्या वक्तव्यामुळे विविध राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.