अकोला : मनोज जरांगे यांनी विधानसभा निवडणूक लढवली नाही तर ते शरद पवारांचा माणूस आहे, यावर शिक्कामोर्तब होईल, असा घणाघात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. प्रकाश आंबेडकर यांनी सध्या आरक्षण बचाओ यात्रा सुरु केली असून ते सोमवारी अकोला येथे बोलत होते.
प्रकाश आंबेडकर म्हणाले की, “मराठा समाजाला ओबीसींच्या कोट्यातून आरक्षण द्यावं या मनोज जरांगेंच्या मागणीसंदर्भात भारतीय जनता पक्षाने भूमिका घेतली नाही. उद्धव ठाकरेंनी यावर मजेशीर भूमिका घेतली. त्यांनी ओबीसींना मोदींकडे जाण्यास सांगितलं. त्यांच्याकडून टक्केवारी वाढवून घ्या आणि त्यानंतर मराठ्यांना ओबीसींमध्ये घ्या आणि आरक्षण देऊन मोकळं व्हा. म्हणजेच कोंबडीच्या खुराड्यात कोल्हा सोडला तर एकही कोंबडी शिल्लक राहणार नाही. अशी ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका आहे. तिथला कुठलाही राजकीय पक्ष याबाबत भूमिका घेणार नाही, हे पक्कं आहे,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “जरांगे पाटील यांनी अवघड जागेचं दुखणं बनण्याची सुरुवात केली आहे. दुर्दैवाने ओबीसींचं आरक्षण हे बळीचा बकरा झालेलं आहे. श्रीमंत मराठा आणि गरीब मराठ्यांचं भांडण आहे. हळूहळू जरांगे पाटील हे शरद पवारांचा माणूस असल्याचं म्हटलं जातंय. ते जर निवडणूक लढले नाहीत तर हा स्टँप पक्का झाला असं समजायचं. त्यांना शरद पवारांनी उभं केलं. त्यांच्या भांडणात ओबीसींनी बळी द्यायचा का? यामध्ये आपण आपला काहीतरी निर्णय घ्यायला हवा. या विधानसभेत किमान १०० ओबीसींचे आमदार निवडून यायला हवेत,” असे आवाहनही त्यांनी केले.