….तर ‘त्या’ योजनेचे मानधन होणार ‘बंद’ !

पारोळा : संजय गांधी निराधार व श्रवण बाळ योजनांचे लाभार्थ्यांनी मोबाईल क्रमांक लिंक असलेले आधार कार्ड, राष्ट्रीयकृत बँक पासबुक प्रत तहसीलच्या संजय गांधी शाखेत जमा करावे. जे लाभार्थी या कागद पत्रांची पूर्तता करणार नाहीत. त्यांना शासनाकडून दरमहा मिळणारे मानधन बंद होण्याची शक्यता आहे.

निराधार, जेष्ठांना आधार ठरणाऱ्या संजय गांधी व श्रावण बाळ योजनांचे आतापर्यंत बँकेत खात्यावर मानधन जमा करण्यात येत होते. मात्र, यापुढे लाभार्थ्यांचे अनुदान डीबीटी पोर्टलवर ऑनलाईनद्वारे जमा करण्यात येणार आहे. त्यासाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ सेवा राज्य  निवृत्तीवेतन  योजनेच्या लाभार्थ्यांनी आपले अपडेट आधार कार्ड ज्यावर मोबाईल क्रमांक नमूद असावा, आधारकार्ड अपडेट नसल्यास मोबाईल क्रमांक आधार कार्डला लिंक करून त्याची पावती व राष्ट्रीयीकृत बँक पासबुकची प्रत तत्काळ आपल्या गावातील तलाठी, कोतवाल किंवा येथील तहसील कार्यालयातील संजय गांधी योजनेच्या शाखेत जमा करावी.

सहा हजारांवर लाभार्थी
संजय गांधी व श्रावण बाळ योजनेचे तालुक्यात जुलै २०२४ अखेर लाभार्थी ६ हजार ५७८ असून आजपर्यंत डीबीटी पोर्टलवर फक्त २ हजार ३६ लाभार्थ्यांची माहिती भरण्यात आलेली आहे. सर्व लाभार्थ्यांची माहिती भरल्याशिवाय पुढील अनुदान वितरित करता येणार नाही. तरी लाभार्थ्यांनी तत्काळ कागदपत्रे सादर करावीत, असे आवाहन तहसीलदार डॉ. उल्हास देवरे यांनी केले आहे.