जळगाव : मे महिन्यात तापमानाने पुन्हा 44 अंश पार केले असून दिवसा उष्ण झळांनी जळगाव जिल्हावासीयांना बेजार झाले आहेत. परंतु, रविवारी भल्या पहाटेच्या सुमारास पाचोरासह अन्य तालुका परिसरातील ग्रामीण भागात मान्सूनपूर्व पावसाने तुरळक प्रमाणात हजेरी लावली. त्यामुळे आर्द्रतेमुळे दमटपणासह उष्णतेत अजून भर पडलेली दिसून येत आहे. आगामी सप्ताहात मंगळवार, बुधवार नंतर तापमानाचा पारा 47 अंश पार करणार असल्याचे अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला आहे.
जिल्ह्यात रविवारी पहाटेच्या सुमारास दोन तीन तालुक्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. सकाळपासूनच तापमानाने देखील 43 अंश पार केले आहे. राज्यात गेल्या सप्ताहात झालेल्या बेमोसमी पावसानंतर आगामी एका आठवड्यात अतितीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. 19 मे पासून हळूहळू तापमानात वाढ होणार आहे. तर 20, 21 आणि 22 मे पासून राज्यात तसेच उत्तर महाराष्ट्रातील जळगाव नाशिक, संभाजीनगर आदी परिसरात तापमान 45 अंश ते 46 अंश अश्या रेकॉर्ड ब्रेक तापमानाची नोंद होण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे. तर अनेक भागात तापमान हे 43 अंश ते 44 अंश राहणार आहे.तसेच स्कायमेटच्या अंदाजानुसार तापमानाचा पारा 47 अंशावर राहणार असल्याचे संकेत आहेत.
यावर्षी अल निनोचा प्रभाव नसल्याने मान्सून वेळेवर दाखल होईल असा अंदाज वर्तविण्यात आला असून या दरम्यान काही भागात वळवाच्या पावसाच्या सरी येण्याचेही संकेत आहेत.
उष्णतेची लाटच
गेल्या सप्ताहात दोन तीन दिवसांपासून तापमानाचा पारा 43/44 अंशावर स्थिर असून दुपारनंतर रात्री उशीरापर्यंत उष्णतेच्या वाफा जाणवत आहेत. आगामी सप्ताहात तापमान 43 ते 45 दरम्यान जरी राहणार असले तरी प्रत्यक्षात वातावरणात आर्द्रतेचे प्रमाण कमी असल्यामुळे उष्णतेचा फटका अधिक जाणवण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तवली आहे.
उन्हाचा पारा 43 च्या वर गेला आहे. यातच उष्णतेपासून बचावासाठी थंडगार पाणी मिळावे याकरिता मातीचा माठ खरेदीकडे नागरिकांचा कल दिसून येत आहे. या मातीच्या मठांची विक्री विक्रमी किमतीत म्हणजेच ३०० रुपये नग ते पुढे या दरांनी होतांना दिसत आहे. जळगाव शहराचे तापमानात वाढ झाल्याने या उन्हाचा परिणाम फळ व भाज्यांवर देखील होतांना दिसत आहे. होत आहे उन्हापासून बचाव करण्यासाठी फळांवरती पाणी मारून त्यांची काळजी घेतली जात आहे.