भुसावळ: शहरातील तापी नदीपात्रात अंजाळ गावातील ४६ वर्षीय प्रौढाने उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना सोमवारी सकाळी सात वाजेपूर्वी घडली. याप्रकरणी फैजपूर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रमोद प्रकाश सपकाळे असे मयताचे नाव आहे.
दरम्यान, तापी पात्रात कुणीतरी उडी घेवून आत्महत्या केल्याची माहिती कळताच वाहनधारकांसह नागरिकांची मोठी गर्दी सकाळच्या सुमारास झाली होती. पोलिसांनी धाव घेत गर्दी पांगवली. सपकाळे यांनी सोमवारी सकाळी सात वाजेच्या पूर्वी तापी पूल गाठत उडी घेतली. खडकावर पडल्याने डोक्याला मार लागल्याने त्यांचा मृत्यू ओढवला. भुसावळ शहर पोलिसांना माहिती कळवल्यानंतर त्यांनी धाव घेतली मात्र मृतदेह सापडल्याची हद्द फैजपूर बाजूकडील असल्याने फैजपूर पोलिसांना सूचित करण्यात आले.
फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार मोती पवार, हवालदार विकास सोनवणे आदींनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करीत मृतदेह यावल येथे शवविच्छेदनासाठी हलवला. फैजपूर पोलिसात गिरीश भास्कर सपकाळे यांच्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मयताच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांनी आत्महत्या का केली? कळू शकले नाही. तपास एएसआय प्रभाकर चौधरी करीत आहेत.