भुसावळ ः पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार व वाळू चोरीच्या गुन्ह्यात वॉण्टेड गिरीश तायडे हा शस्त्रांसह वाहनातून येत असल्याची माहिती बाजारपेठ पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाल्यानंतर रविवारी पहाटे पोलिसांनी कोम्बिंग राबवले मात्र पोलिसांना पाहताच संशयित स्कॉर्पिओतून पसार होवू लागताच पोलिसांनी पाठलाग करून वाहन अडवले मात्र गिरीश तायडे पसार होण्यात यशस्वी झाला तर त्याचे तीन साथीदार मात्र जाळ्यात अडकले. संशयितांकडून तीन गावठी पिस्टल, चार जिवंत काडतूस, सहा फायबर रॉड, तीन मोबाईल काडतूस व स्कॉर्पिआ वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असल्याची माहिती पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी रविवारी दुपारी पाच वाजता बाजारपेठ पोलिसात ठाण्यात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. ते म्हणाले की, संशयित गिरीश तायडे व साथीदारांकडून या शस्त्रांद्वारे जुन्या वादातून झालेल्या हल्ल्यातून एखाद्याचा बदला घेण्याची (रीव्हेंज) शक्यताही होती मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी शस्त्र जप्त केले आहेत. लवकरच संशयित तायडेच्या मुसक्या आवळण्यात येतील, असेही पिंगळे यावेळी म्हणाले.
तीन पिस्टलासह चार काडतूस जप्त
nपोलिसांनी धीरज प्रकाश सोनवणे (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका), मुकेश जयदेव लोढवाल (23, ज्ञानज्योती शाळेजवळ, बिंदीया नगर, खडका) व संजय शांताराम कोळी (39, पाण्याच्या टाकीजवळ, खडका) यांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची अंगझडती घेतली असता मुकेश व संजय यांच्याकडे दोन पिस्टल व दोन काडतूस तर वाहनात एक पिस्टल व दोन जिवंत काडतूस आढळल्याने ते जप्त करण्यात आले.