2023 च्या एकदिवसीय विश्वचषकात चमकदार कामगिरी करणारा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी दुखापतीमुळे टीम इंडियातून बाहेर आहे. विश्वचषकानंतर शमी अद्याप आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. मात्र, शमीसाठी आजचा दिवस खूप खास आहे. वास्तविक, 33 वर्षीय शमीला आज (मंगळवारी) देशाचा दुसरा सर्वोच्च क्रीडा सन्मान अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यावेळी त्याने त्याच्या फिटनेस आणि कमबॅकबद्दल सांगितले.
घोट्याच्या दुखापतीतून सावरणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याने इंग्लंडविरुद्धच्या आगामी मायदेशातील कसोटी मालिका लक्षात घेऊन फिटनेसची सर्वोच्च पातळी गाठण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. विश्वचषक स्पर्धेतील सात सामन्यांत २४ बळी घेणारा शमी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाला की, माझा उद्देश स्वत:ला जास्तीत जास्त तंदुरुस्त ठेवण्याचे आहे, कारण पुढील दोन स्पर्धा आणि मालिका मोठ्या आहेत. मी फिटनेसवर लक्ष केंद्रित करेन.
तो पुढे म्हणाला, “माझ्या कौशल्याबद्दल कोणतीही चिंता नाही, कारण माझा विश्वास आहे की मी माझा फिटनेस राखला तर कौशल्य आपोआपच मैदानावर दिसून येईल. सध्या बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (एनसीए) पुनर्वसन सुरू आहे. शमीसाठी, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वैद्यकीय पथकाने मंजुरी न दिल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या मालिकेत तो खेळू शकला नाही.
इंग्लंडविरुद्धची पाच कसोटी सामन्यांची मालिका २५ जानेवारीपासून सुरू होत आहे. या मालिकेतून टीम इंडियात पुनरागमन करण्याचा शमीचा डोळा आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत 64 कसोटी सामन्यांमध्ये 229 बळी घेणारा हा वेगवान गोलंदाज अर्जुन पुरस्कार मिळाल्यावर म्हणाला, “हे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे आहे, ही माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी उपलब्धी आहे, माझ्या मेहनतीचे फळ आहे. कोणीही तुमचे नशीब बदलू शकत नाही. जर नियतीने काही ठरवले असेल तर ते होईलच. माणसाने सतत मेहनत केली पाहिजे आणि त्याचे फळ नक्कीच मिळेल.”