यवतमाळ : बदलापूर अत्याचार घटनेच्या निषेधार्थ विरोधकांनी शनिवारी काळ्या फिती बांधून आंदोलन केलं. यावर आता फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ते यवतमाळ येथे लाडकी बहिण योजनेच्या कार्यक्रमात बोलत होते. तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. कारण तुम्ही समाजात अराजक तयार करण्याचा प्रयत्न करत आहात, असा हल्लाबोल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांवर केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची घोषणा केल्यावर विरोधकांनी विधानसभेत आमच्यावर खूप टीका केली. ही फसवी योजना आहे. १० टक्के महिलांनाही या योजनेचा फायदा होणार नाही, असे ते म्हणाले. पण या नादान लोकांना बहिणींचं प्रेम काय असतं हे माहिती नाही. दीड कोटी बहिणींच्या खात्यात या योजनेचे पैसे जमा झाले असून उर्वरित महिलांच्या खात्यातही पैसे जाण्यास सुरुवात झाली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत फॉर्म भरणाऱ्या सर्व महिलांना आम्ही सप्टेंबर महिन्यात तीन महिन्यांचे पैसे देणार आहोत. तसेच सप्टेंबर महिन्यातही आम्ही अर्ज स्विकारणार आहोत. जोपर्यंत शेवटचा अर्ज येत नाही तोपर्यंत आम्ही थांबणार नाही.”
“बदलापूरची घटना काळीमा फासणारी आहे. पण अशी घटना घडल्यानंतर विरोधकांची पहिली मागणी आहे की, आम्हाला लाडकी बहिण योजना नको, सुरक्षा द्या. पण आम्ही लाडकी बहिण योजनाही देऊ आणि त्यांना सुरक्षाही देऊ. आपल्या काळात काय झालं हे विरोधक सांगत नाहीत. आम्ही मोठ्या प्रमाणात अशा घटनांची दखल घेऊन त्यावर कारवाई करत आहोत,” असे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, “अशा गोष्टींचं राजकारण करणं म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस आहे. काही लोकांना यातही मतांचं राजकारण करायचं आहे. ते तोंडाला पट्ट्या लावून बसतात. माझी त्यांना विनंती आहे की, तुमच्या तोंडाला पट्ट्याच बऱ्या आहेत. कारण तुम्ही खऱ्या अर्थाने समाजात अराजक तयार करण्याचा प्रयत्न करत आहात. त्यामुळे संवेदनशील बाबींवरही राजकारण करणाऱ्यांना त्यांची जागा दाखवली पाहिजे,” असेही ते म्हणाले.