मुंबई : मुंबई- पुणे कडे जाणाऱ्या प्रवाशांचे हाल होणार आहे. गुरुवारी (२४ जानेवारी) मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक दुपारी 12 ते 2 वाजेपर्यंत पूर्णपणे बंद राहील. द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसवण्यासाठी हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांची (हलकी व जड वाहने) वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिली आहे.
हा मार्ग वापरा
वाहनचालक पर्यायी मार्गाने प्रवास करू शकतात. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे की, मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा किमी 8.200 येथून वळविली जातील आणि राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 48 जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरून शिंगरोबा घाट मॅजिक पॉइंट किमी 42.000 येथून पुणे वाहिनीकडे वळविण्यात येतील.
समस्या असल्यास येथे संपर्क साधा
गॅन्ट्री बसविण्याचे काम पूर्ण झाल्यानंतर दुपारी 2 वाजता पुण्याहून मुंबईकडे जाणारी वाहतूक द्रुतगती मार्गावरून पुन्हा सुरू होईल. दरम्यान, ब्लॉकच्या काळात वाहनधारकांना काही अडचणी आल्यास त्यांनी मदतीसाठी मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे कंट्रोल रूमच्या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने दिलेला फोन नंबर ९८२२४९८२२४ किंवा महामार्ग पोलीस विभागाचा फोन नंबर ९८३३४९८३३४ आहे.