तुम्ही काय एवढे मोठे सुप्रिमो नाही ; मनोज जरांगेंवर मंत्री महाजनांची टीका

जळगाव | मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसापूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत गंभीर स्वरूपाचे आरोप केले. यांनतर भाजप नेत्यांनी मनोज जरांगे पाटीलांमागे राजकीय हात असल्याचा आरोप केला असून जरांगे यांची एसआयटी चौकशीची मागणी विधानसभेत करण्यात आली. यांनतर विधानसभा अध्यक्षांनी एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. यामुळे मनोज जरांगे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.

यातच मनोज जरांगेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर केलेल्या आरोपावर मंत्री गिरीश महाजन यांनी प्रतिक्रिया दिली. जरांगे शरद पवार गटाचे प्रवक्ते आहेत का? असा सवाल त्यांनी केला आहे. तसेच आमच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरली, तुम्ही काय एवढे मोठे सुप्रिमो नाही अशी टीका गिरीश महाजन यांनी जरांगे पाटील यांच्यावर केली आहे.

नेमकं काय म्हणाले मंत्री महाजन?
मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करीत आहेत. म्हणून आम्ही त्यांच्या आंदोलनाची दखल गांभीर्याने घेतली होती. नंतर आणखी काही मंत्री देखील त्यांना भेटले. मुख्यमंत्री देखील भेटले. नंतर मोर्चा घेऊन नवीमुंबईत आल्यानंतर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी त्यांची भेट घेतली. इतका आदर आम्ही जरांगेचा केला परंतू गेल्या काही दिवसांपासून त्यांनी राजकीय टीका करायला सुरुवात केली. आमच्या नेत्यांबद्दल अशी भाषा वापरली, तुम्ही काय एवढे मोठे सुप्रिमो नाही असं गिरीश महाजन म्हणाले.

ते शिवसेनेचे किंवा राष्ट्रवादीचे प्रवक्ते असल्याप्रमाणे बोलत आहेत. शिवसेना कशी फोडली. राष्ट्रवादी कशी संपविण्याचा प्रयत्न केला जातोय हे सांगणं त्यांचे काम नाही. त्यांनी केवळ आरक्षणावर बोलावं असेही महाजन यावेळी म्हणाले. एका रात्री पोलिसांचा चुकीचा लाठीमार झाल्याने ते हिरो झाले. म्हणून वाटेल ती मागणी तुम्ही कराल ती पूर्ण होणार काय? असाही सवाल महाजन यांनी करीत जरांगे यांची एसआयटी चौकशी करण्यात येणार असल्याचे सांगितले.