तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांनी इस्राईल विरोधात लष्करी कारवाई करण्याची धमकी दिली आहे. इस्राईल हमास संघर्ष सुरु असतानाच, हिजबुल्लाहनंतर तुर्कीने इस्राईलविरोधात आघाडी उघडण्याचे संकेत दिले आहेत. मात्र तुर्कीच्या धमकीचा इस्राईलवर काहीही परिणाम झालेला नसून, तुर्कीचे राष्ट्रपती एर्दोगन यांची अवस्था नक्कीच सद्दाम हुसैनसारखी होईल अशी धमकी इस्राईलने दिली आहे.
इस्राईलचे परराष्ट्रमंत्री इस्राईल काट्झ यांनी समाजमाध्यमांवरील आपल्या पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, इस्राईलला धमकी देऊन एर्दोगन हे सद्दाम हुसैनचाच मार्ग स्विकारत आहेत. मात्र सद्दाम हुसेन यांच भविष्य काय झाले याची माहिती एर्दोगन यांनी माहिती घेणे आवश्यक आहे, असेही इस्राईल काट्झ यांनी आपल्या संदेशात लिहिले आहे. इस्राईल हमास युद्धानंतर हिजबुल्लाह यांनी इस्राईलवर आक्रमण केले होते. इस्राईलने त्याला देखील चोख प्रतिउत्तर दिले.
आता हिजबुल्लाहनंतर तुर्कीने देखील इस्राईलमध्ये घुसून आक्रमण करण्याची धमकी दिली आहे. याआधी देखील अशा मोहिमा तुर्की सैन्याने केल्या असल्याचे एर्दोगन यांनी सांगितले. एर्दोगन यांनी हमासवर आक्रमण केल्यापासूनच इस्राईलवर कायमच सडकून टिका केली आहे.
तसेच हमासवरील हल्ल्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवरून देखील एर्दोगन यांनी कायमच निषेध व्यक्त केला आहे. तुर्कीला सामर्थ्यशाली व्हावे लागेल कारण, त्यामुळेच इस्राईलवर दबाव वाढू शकतो असेही एर्दोगन यांनी म्हटले आहे. मात्र एर्दोगन यांना इस्राईल हमास युद्धात हस्तक्षेप न करता, शांत राहण्याचा उपरोधिक सल्ला इस्राईलने दिला आहे.