जळगाव : जिल्हा सहकारी दूध संघातील तूप अपहारप्रकरणी दाखल गुन्ह्यात कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यासह चौघांना शहर पोलीस ठाण्याच्या पथकाने रात्री अटक केली. या कारवाईमुळे राजकीय व सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. संघाच्या कार्यकारी संचालकांनाच अटक केल्यामुळे संचालक मंडळही अडचणीत येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी राजकीय दबावातून ही कारवाई झाल्याचा आरोप आमदार एकनाथ खडसे यांनी केला आहे.
दूध संघातील विक्री विभागाने ‘अ’ दर्जाचे ५२५ रुपये किलोचे तूप ८५ रुपये किलो याप्रमाणे विकले. यात सात लाख ९२ हजार रुपयांचे नुकसान झाले. या गुन्ह्यात पुरवणी जबाबावरून कार्यकारी संचालक लिमये, हरी पाटील, किशोर पाटील व अनिल अग्रवाल यांना शहर पोलिसांनी रात्री अटक केली. दूध संघातून तुपाची परस्पर विक्री करून अपहार केल्याचा पहिला गुन्हा सप्टेंबरमध्ये दाखल करण्यात आला. यानंतर कार्यकारी संचालक लिमये यांनी लोणी चोरी झाल्याबाबत तक्रार दिली होती. यानंतर आणखी दोन तक्रारी आल्या होत्या. यातील जबाबानुसार दूध संघात एकूण एक कोटी १५ लाखांचा अपहार करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दूध संघातील गैरव्यवहारांची चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने नुकतीच समितीची नियुक्ती केली. या समितीकडून चौकशी सुरू असतानाच तूप विक्रीत अपहार झाल्याचे समोर आले. या बाबत सहाय्यक कार्यकारी संचालक शैलेश मोरखडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. त्यात अटकेची ही कारवाई झाल्याचे सांगण्यात आले. गुन्ह्यातील मूळ तक्रारीत संघाचे कार्यकारी संचालक, अध्यक्षा तसेच काही संचालक व मोजक्या कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचे नमूद केले आहे.
दरम्यान, दुसरा गुन्हा देखील शहर पोलीस ठाण्यात दाखल असून, भाजपचे चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण व कार्यकारी संचालक मनोज लिमये या दोघांच्या तक्रारींचीही चौकशी सुरू आहे. कार्यकारी संचालक लिमये यांच्यावरील कारवाई आमदार खडसे गटाला धक्काच मानला जात आहे. सध्या दूध संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू असून, तत्पूर्वीच चौघांना अटक झाल्याने आता अटकसत्र सुरू होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अपहार व चोरीचा एक गुन्हा दाखल आहे.
राजकीय दबावातून कारवाई
जिल्हा दूध संघाच्या निवडणुकीवर प्रभाव टाकण्यासाठी कार्यकारी संचालक मनोज लिमये यांच्यावर राजकीय दबावातून कारवाई करण्यात आली आहे. दूध संघात सूडाचे राजकारण केले जात असून, या संदर्भात आम्ही न्यायालयात दाद मागणार आहोत. पोलिसांच्या भूमिकेवरदेखील आता संशय येत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.