अंतरवाली सराटी: मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्यावर ओबीसी नेत्यांनंतर खुद्द मराठा आंदोलनकर्ते आरोप करत आहे. आधी बारासकर महाराज आणि आता संगीत वानखेडे, यांनी देखील त्यांच्यावर आरोप केले होते.
त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे देखील जारांगे- पाटलांवर टीका करतांना म्हणाले कि, मनोज जरांगे पाटील यांच्या शब्दात आता दम राहिलेला नाही. जे मिळालंय, त्यामध्ये त्यांनी समाधानी राहावे. जरांगे-पाटील यांच्या बोलण्यात आता गर्व आणि गुर्मी जाणवते. अशाने जरांगे पाटील यांचा हार्दिक पटेल होईल. अशी टीका वडेट्टीवार यांनी केली होती.
शुक्रवारी अंतरवाली सराटीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत असतांना, विजय वडेट्टीवारांच्या वक्तव्यावर मनोज जरांगे यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी एकेरी भाषेत बोलताना विजय वडेट्टीवार यांना चांगलेच फटकारले. वडेट्टीवारांनी आम्हाला दम वगैरे शिकवू नये. राहुल गांधींनी तुम्हाला मराठ्यांच्या नादाला लागायला, टीका करायला सांगितले आहे का? हा विरोधी पक्षनेता आहे की कोण आहे? विरोधी पक्षनेता तुझ्या घरातलं पद नाही, ते जनतेचं पद आहे. विरोधी पक्षनेता कोणत्याही एका जातीचा नसतो. आमचा दम कशाला काढता, आमचा दम तुम्ही मुंबईत बघितला नाही का? राहुल गांधी साहेब असले नेते कशाला निवडतात काय माहिती. तू तुझ्या पक्षाचं बघ ना. नाहीतर सगळा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय करिअर बरबाद होईल. त्यामुळे राहुल गांधी यांनी वडेट्टीवारांना नीट बोलायला सांगावे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले.