तोडगा निघाला! एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ

मुंबई । वेतन वाढीसह विविध मागण्यांसाठी ३ सप्टेंबरपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. एसटींची वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे राज्यभरातील प्रवाशांची गैरसोय होताना दिसून ,आली.अशातच एसटी कर्मचाऱ्यांनी अखेर संप मागे घेतला असून एसटी कर्मचाऱ्यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. विशेष म्हणजे शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनात साडे सहा हजारांची वाढ केली आहे.

राज्य परिवहन महामंडळातील कर्मचाऱ्यांना एप्रिल २०२० पासून मुळ वेतनामध्ये ६५०० रुपयांची वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली कर्मचारी संघटनांची बैठक झाली. यामध्ये सुरुवातीलाच राज्य शासन एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मक असताना उत्सवाच्या काळात संप करून सामान्यांना वेठीस धरणे योग्य नाही असे बोलत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपाबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली.

संघटनांनी यावेळी केलेल्या वेतनवाढीच्या मागणीबाबत मधला मार्ग काढून एसटी कर्मचाऱ्यांना दिलासा देण्याची भूमिका असल्याचे सांगत एप्रिल २०२० पासून कर्मचाऱ्यांच्या मुळ वेतनात ६५०० रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. त्याचबरोबर राज्यातील आगारांमध्ये चालक-वाहकांसाठी असणारी विश्रामगृहांची दुरवस्था दूर करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. चालक-वाहकांना चांगल्या सोयीसुविधा मिळायला पाहिजेत, असे सांगतानाच एसटीचा महसुल वाढीसाठी कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले.यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.