त्यांच्या आंदोलनाचा मला फटका , असे का म्हणाले महादेव जानकर

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी आंदोलन छेडले आहे. या आंदोलनाचा काही प्रमाणात आपणास फटका बसला असल्याचे मत महायुतीचे परभणीचे लोकसभा मतदार संघातील उमेदवार महादेव जानकर यांनी व्यक्त केले आहे. ते एका वृत्तवाहिनीवर बोलत होते. दरम्यान, महादेव जानकर यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे संजय उर्फ बंडू जाधव यांनी लढत दिली आहे.
जानकर यांनी पुढे दावा केला की, महाराष्ट्र राज्यात ४८ जागांपैकी महायुतीला ४२ तर महाविकास आघाडीला केवळ ६ जागा मिळतील. ते पुढे म्हणाले की, मी राज्यात सुमारे ५५ सभा घेतल्या. या सभांच्यानिमित्ताने महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचार केला. आता मतदान संपले आहे. माझ्या मतदार संघातील पाण्याचा प्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्या असून आचार संहिता संपल्यावर परभणीचे प्रश्न कॅबिनेट
मध्ये घेण्यात यावेत या याकरिता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रयत्न करेल.
ते पुढं म्हणाले, परभणीच्या जनतेचा आशीर्वाद कोणाला मिळाला हे ४ जून रोजी कळेल. मी परभणीच्या जनतेचे आभार मानतो. कारण
परभणीच्या जनतेने मला लवकर स्वीकारलं. विकासाच्या मुद्यांवर येथील जनतेनं माझ्यावर प्रेम केलं. सर्व समाजातील घटकांनी मला मदत करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ४ जून रोजी विजयाचा गुलाल हा माझा असेल असा विश्वास वाटतो.

ते म्हणाले, सब सामान तो देश महान या अजेंड्यावर प्रमुख ध्येय आहे. मी विकासाच्या माध्यमातून कार्य करत आहे. माझ्या पक्षातून पहिले दोन आमदार हे मराठा समाजाचे झाले. माझ्या पक्षाचा एक विद्यमान आमदार हा ओबीसी आहे. तसेच काही ठिकाणी मुस्लिम समाजाचे नगरसवेक आहेत. त्यामुळे सर्व समाजाला बरोबर घेऊन जाण्याचा माझा अजेंडा आहे. मी छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेला माणनारा मी कार्यकर्ता आहे. त्यामुळे सर्व समाजाची प्रगती झाली तर देशाची प्रगती होईल. या इराद्याने पुढे चाललो आहे. परंतु, काही प्रमाणात मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचा मला काही प्रमाणात फटका बसला अशी कबुली दिली.