शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे यांनी अखेर निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर शिवतारे यांनी माघार घेतल्याचं सांगितलं जात आहे. पुरंदरमध्ये कार्यकर्त्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर पत्रकार परिषद घेत शिवतारे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. विजय शिवतारेंनी माघार घेतल्याने या मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत अनेकदा चर्चा होऊनही माघार घेण्यास तयार नसलेल्या शिवतारे यांनी अचानक यू-टर्न कसा घेतला, याबाबत चर्चांना उधाण आलं आहे. याबाबत स्वत: शिवतारे यांनीच आजच्या पत्रकार परिषदेत खुलासा केला आहे.
लोकसभा निवडणुकीतून माघार घेण्याच्या निर्णयाबद्दल बोलताना विजय शिवतारे म्हणाले की, “कोणत्याही स्थितीत ही निवडणूक लढवायचीच, असा निर्धार आम्ही केला होता. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या बैठकीनंतर आणि उपमुख्यमंत्र्यांसोबत फोनवर झालेल्या चर्चेनंतरही आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम होतो. मात्र २६ तारखेला मला मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी खतगावकर यांचा फोन आला. तेव्हा त्यांनी मला सांगितलं की, आपल्या भूमिकेमुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होत आहे. महायुतीचं वातावरण बिघडून राज्यात महायुतीचे १०-१५ खासदार पडू शकतात. मतांचं विभाजन होऊन महाविकास आघाडीचा फायदा होईल. मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीने हे सगळं सांगितल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांशी फोनवर बोललो. त्यानंतर २८ तारखेला रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत माझी रात्री ११ ते २ अशी तब्बल तीन तास चर्चा झाली. या चर्चेत मी विकासकामांबद्दल असलेल्या माझ्या मागण्या मांडल्या. त्याबाबत सकारात्मक प्रतिसाद आल्याने मी या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेतला,” असा दावा शिवतारे यांनी केला आहे.