‘त्या’ नकली नोटांचे धागेदोरे थेट मध्य प्रदेशपर्यंत; पोलिस ‘मास्टरमाइंड’च्या मागावर

जळगाव : एक लाख खऱ्या नोटांच्या मोबदल्यात तीन लाखांच्या बनावट नोटा घेताना जळगावच्या दोघांसह रावेरच्या एकाला भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी शिताफीने अटक करीत त्यांच्याकडून तीन लाखांच्या बनावट नोटा जप्त केल्या होत्या. बुधवार, ४ सप्टेंबर रोजी नाहाटा महाविद्यालयाच्या परिसरात झालेल्या या कारवाईने भुसावळ शहरात मोठी खळबळ उडाली होती. अटकेतील तिघांना भुसावळ न्यायालयात गुरुवारी हजर केले असता न्यायालयाने पाच दिवसांची (१० सप्टेंबर) पोलीस कोठडी सुनावली. दरम्यान, या प्रकरणाचे धागेदोरे थेट मध्य प्रदेशात जुळल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, त्यादृष्टीने पोलिस ‘मास्टर माइंड’च्या मागावर आहेत.

नकली नोटा प्रकरणात भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी अटक केलेल्या सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (उस्मानिया पार्क, जळगाव) याच्याविरोधात वरणगाव पोलिसात ईसी अॅक्ट अन्वये गुन्हा दाखल आहे तर अब्दुल हकीम अब्दुल कागल (५७, रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) विरोधात बनावट नोटा चलनात बाळगल्याप्रकरणी तब्बल पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात एमआयडीसी, जळगाव, जिल्हापेठ, मलकापूर येथे प्रत्येकी एक तर जळगाव शहरला दोन गुन्हे दाखल आहेत. आरोपी अब्दुल हकीम हा बुधवारी भुसावळात जळगावच्या दोघा संशयीतांकडून बनावट नोटा खदेदीसाठी आला मात्र पोलिसांनी गोपनीय माहितीद्वारे तिघांच्या मुसक्या बांधत्या.

बाजारपेठ पोलिसांनी संशयीत सैय्यद मुशाईद अली मुमताज अली (३८, रा. उस्तानिया पार्क, शिवाजीनगर, जळगाव), नदीम खान रहीन खान (३५, रा. सुभाष चौक, शनिपेठ, जळगाव), अब्दुल हकीम अब्दुल कागल (५७, रसलपुर रोड, अब्दुल हमीद चौक, रावेर) यांना अटक केली आहे. संशयीतांना गुरुवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

बनावट नोटा पकडणाऱ्या बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्यासह पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचा गुरुवारी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी जळगावात रिवॉर्ड देवून गौरव केला तसेच भविष्यातही चांगल्या कामाची अपेक्षा व्यक्त केली. यांनी केली कारवाई ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे, हवालदार विजय नेरकर, हवालदार निलेश चौधरी, शिपाई प्रशांत परदेशी, शिपाई योगेश माळी, शिपाई अमर अढाळे, शिपाई दिलीप कोल्हे, शिपाई राहुल वानखेडे, शिपाई भूषण चौधरी आदींच्या पथकाने केली. तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे करीत आहेत.