मुंबई: अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आशिष दुवा, सोनल पटेल यांच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी काँग्रेस पक्षातर्फे काही दिवसांपूर्वीच विधानसभानिहाय समन्वयकांची यादी जाहीर करण्यात आली होती. या समन्वयकांची विशेष बैठक गुरुवारी मुंबई काँग्रेसच्या कार्यालयात बोलविण्यात आली होती.
या बैठकीत काँग्रेसमधील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. पदाधिकाऱ्यांमधील ही नाराजी समोर आली आहे. मुंबई काँग्रेसच्या पक्ष कार्यालयात आयोजित या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना शिवीगाळ केल्याची माहितीही समोर आली आहे.उपस्थित समन्वयकांनी विधानसभेसाठी ब्लॉक अध्यक्ष त्यांच्या पसंतीचे नसल्याने नाराजी व्यक्त केली. त्यानंतर अनेक आजी-माजी सदस्य थेट हमरीतुमरीवर आले. नाराज पदाधिकाऱ्यांनी प्रतिस्पर्धी गटांना शिवीगाळ सुरू केली.
आगामी निवडणुकीसाठी आयोजित या बैठकीत अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजी व्यक्त केली होती. बैठक सुरू होण्यापूर्वी दक्षिण मध्य मुंबईतील एका पदाधिकाऱ्याने थेट आशिष दुवा आणि इतर पदाधिकाऱ्यांसमोर नाराजी व्यक्त केली. पक्षात आपला योग्य सन्मान ठेवला जात नाही. आपल्या मर्जीतील ब्लॉक अध्यक्ष न देता आपल्याकडून कामाची अपेक्षा केली जाते, अशी तक्रार या पदाधिकाऱ्याने केल्याची माहिती आहे.