नवी दिल्ली: लोकसभा निवडणुका जवळ येत आहेत.या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या इंडिया आघाडीत जागावाटपाची चर्चा सुरु आहे. पंजाबमध्ये स्वबळावर लढण्याची घोषणा करणाऱ्या आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये कॉंग्रेसोबत आघाडीचा निर्णय घेतला आहे. दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाचे सूत्र निश्चित झाले असून लोकसभेच्या दिल्लीतील सात पैकी चार जागांवर आप तर तीन जागांवर कॉंग्रेस लढेल, असे समजते.
आप चार तर काँग्रेस तीन जागांवर लढण्याची शक्यता आहे. काँग्रेस पूर्व दिल्ली, ईशान्य दिल्ली आणि चांदनी चौकातून निवडणूक लढवणार आहे, तर आप पश्चिम दिल्ली, दक्षिण दिल्ली, नवी दिल्ली आणि दक्षिण पश्चिम जागांवर उमेदवार उभे करणार आहे.यावर दोन्ही पक्षांची प्राथमिक सहमती झाली आहे. यापूर्वी आम आदमी पार्टीने दिल्लीत काँग्रेसला फक्त एक जागा देण्याचे म्हटले होते. काँग्रेसला एकही जागा देण्यासाठी आकडेवारी पुरेशी नाही. मात्र युती धर्माचे पालन केल्यास काँग्रेसला एक जागा देऊ, असे आप राज्यसभा खासदार संदीप पाठक यांनी म्हटले होते.
दिल्लीतील महानगर पालिका निवडणुकीतील कॉंग्रेसच्या मतदानाची आकडेवारी आणि मागील विधानसभा निवडणुकीत आपच्या घटलेल्या जागांचा दाखला देत कॉंग्रेसचा आग्रह आणखी एका जागेसाठी आहे. याखेरीज कॉंग्रेसने चंडीगड लोकसभा मतदार संघाची देखील आप कडून मागणी केली होती. तर आम आदमी पक्ष गुजरातमध्ये कॉंग्रेसने दोन ते तीन जागा सोडाव्यात यासाठी आग्रही आहे. यावर दोन्ही पक्षांच्या वाटाघाटी सुरू असल्याने दिल्लीतील आघाडीवर सहमती होऊनही अद्याप औपचारिक शिक्कामोर्तब झाले नसल्याचेही सुत्रांनी सांगितले.