दिल्ली उच्च न्यायालयाची केजरीवालाना चपराक

दिल्लीतील मद्यधोरणासंदर्भात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल याना इडीने केलेल्या कारवाईवर दिल्ली उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती स्वर्णकांता शर्मा यानी शिक्कामोर्तब केले आहे. त्यामुळे या प्रकरणात हुतात्मा म्हणून केजरीवालांची संधी हुकली आहे. उच्च न्यायालयात केजरीवालांची बाजू मांडण्यासाठी अधिवक्ता अभिषेक मनू सिंघवी यांनी यक्तीवाद करताना प्रयत्नांची पराकाष्ठा केली पण न्यायमूर्तीनी त्यांचे सर्व मुद्दे बिनतोड युक्तिवादाच्या आधारे फेटाळून लावले.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा केजरीवालांच्या वकिलाचा आरोपही फेटाळून लावला. इडीने केजरीवालांच्या विरोधात प्रत्यक्ष सहभागाचे केलेले आरोप ठोस असल्याचा व या प्रकरणात केजरीवाल यांचा सहभाग स्पष्ट करणारेच आहेत असा निर्वाळाही न्यायमूर्तीनी दिला. केजरीवालांवरील अटक कारवाईचा व त्यांच्या रिमांडचा राजकारणाशी संबंध असल्याचा आरोप फ `टाळताना न्यायमूर्ती म्हाणाल्या की, या कारवाईचा राजकारणाशी व निवडणूक प्रचाराशी संबंध जोडता येणार नाही. तसेच केजरीवाल केवळ मुख्यमंत्री आहेत म्हणून त्याना वेगळा न्याय देण्याचा प्रश्नच उपस्थित होत नाही. या प्रकरणात जमा करण्यात आलेल्या रकमांचा

गोव्यातील निवडणुकीत वापर झाल्याचे इडीने सादर केलेले परावे केजरीवालांची गुन्हेगारी सिध्द करणारेच असल्याचा निर्वाळा न्यायमूर्तीनी दिला. माफीच्या साक्षीदारासंबंधीचा सिंघवी यानी केलेला युक्तिवादही श्रीमती शर्मा यानी फेटाळून लावला. या प्रकरणातून हुतात्मा म्हणून मिरविण्याचा केजरीवाल समर्थकांनी सामूहिक उपोषण व अन्य मार्गाचा अवलंब केला असला तरी आजच्या निर्णयाने तो पूर्णपणे फसला आहे. खरे तर या निर्णयानंतर केजरीवालानी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामाच द्यायला हवा. पण तशी हिंमत केजरीवाल करणार नाहीत असे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.

– ल.त्र्यं. जोशी, ज्येष्ठ पत्रकार,

नागपूर ९६९९२४०६४८