दिल्ली पोलिसांनी ‘आपच्या’ आंदोलनाची परवानगी नाकारली, पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थान मार्गाची सुरक्षा कडक

अबकारी धोरण भ्रष्टाचारप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेविरोधात आप नेते आणि कार्यकर्ते मंगळवारी (२६ मार्च) पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. दरम्यान, आम आदमी पार्टीला आंदोलनाची परवानगी देण्यात आली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

उपपोलीस आयुक्त देवेश कुमार महाला म्हणाले, आपला आंदोलन करण्यास कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आम्ही पंतप्रधान निवासस्थान आणि पटेल चौक मेट्रो स्टेशनवर पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. मोर्चा किंवा निदर्शनास परवानगी दिली जाणार नाही.

पंतप्रधान निवासस्थानाजवळील रस्ता बंद
दिल्ली पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव लोक कल्याण मार्ग, पटेल चौक स्टेशनचे गेट क्रमांक 3 आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्टेशनचे गेट क्रमांक 5 पुढील सूचना मिळेपर्यंत प्रवेश बंद राहतील असे म्हटले आहे. दिल्ली पोलिसांनी पंतप्रधानांच्या शासकीय निवासस्थान, 7, लोककल्याण मार्गाची सुरक्षा कडक केली आहे. राष्ट्रीय राजधानीतील इतर अनेक भागातही पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे.

कलम 144 लागू
दिल्ली पोलिसांनी सांगितले कि,  पंतप्रधानांच्या निवासस्थानाभोवती कलम 144 आधीच लागू आहे आणि कोणालाही आंदोलन करण्याची परवानगी दिली जाणार नाही. केजरीवाल यांच्या अटकेविरोधात दिल्ली सरकारचे मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी पंतप्रधानांच्या निवासस्थानाचा घेराव करण्याची घोषणा केली होती.